टोयोटोची ‘लुनर क्रूझर’, चंद्रावर धावणारी कार

टोयोटो लवकरच अंतराळात चंद्रावर धावणारी कार तयार करत असून या कारचे नाव पृथ्वीवर धावणाऱ्या आणि कंपनीच्या लोकप्रिय ‘ लँड क्रुझर’ प्रमाणे ‘ लुनर क्रुझर’ असे निश्चित केले गेले आहे. या कारमुळे लोकांना चंद्रावर राहताना किंवा नंतर मंगळावर राहताना मोठी मदत मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. या क्रुझरचे डिझाईन स्वदेशी जपानी एअरोस्पेस एक्सलरेशन एजन्सी (जाक्सा)च्या सहकार्याने बनविले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या क्रुझर मध्ये बसल्या बसल्या अंतराळवीर चंद्र वा मंगळाच्या पृष्ठभागावरून सुरक्षितरित्या एकमेकांशी बोलणे, कामे करणे, भोजन, झोप घेणे या क्रिया सहज करू शकतील. या कारला एक रोबोटिक आर्म असेल जो अंतराळात निरीक्षण व देखभालीचे काम करेल.

चंद्रपृष्ठभागावर प्रवास करताना आवश्यक असलेली गुणवत्ता, आराम, विश्वसनीयता लक्षात घेऊन या कारचे नामकरण लुनर क्रुझर केले गेल्याचे प्रोजेक्ट प्रमुख ताकाओ सतो यांनी सांगितले. ते म्हणजे या शतकात अंतराळ क्षेत्रात महत्वपूर्ण परिवर्तन होत असून या क्षेत्राकडे आम्ही भविष्यातील महत्वाचे क्षेत्र म्हणून पाहतो आहोत. अंतराळ संचार व अन्य तंत्रविकास माणसासाठी मूल्यवान आहे. या दशकाअखेर असे वाहन अंतराळात प्रक्षेपित केले जाईल .