भाजप देशातील सर्वात श्रीमंत, बसपा दोन तर कॉंग्रेस तीन नंबरवर

असोसीएशन ऑफ डेमोक्रॅटिक रीफॉर्म म्हणजे एडीआरने वित्तवर्ष २०१९-२० साठी राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला असून या वर्षात भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. या अहवालानुसार देशातील सात राष्ट्रीय पक्षांची एकूण संपत्ती ६९८८.५७ कोटी इतकी असून ४४ प्रादेशिक पक्षांची एकूण संपत्ती २१२९.३८ कोटी असल्याचे नमूद केले गेले आहे. या यादीत भाजप ४८४७.७८ कोटी  नंतर मायावतींचा बहुजन समाज पक्ष ६९८.३३ कोटी आणि कॉंग्रेस ५६३.४७ कोटी, अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

निवडणुका जवळ आल्या कि सर्वसामान्यपणे राजकीय पक्ष, त्यांच्याकडचा पैसा या बाबी चर्चेत येतात. राजकीय पक्षांच्या संपत्तीत त्यांच्या मालकीच्या जमिनी, मालमत्ता, रोख रक्कम, ठेवी, बँकेतील शिल्लक समाविष्ट असते. राजकीय पक्ष हा पैसा निधी, देणग्या, सदस्यत्व अश्या अनेक मार्गांनी मिळवितात. सर्व नोंदणी कृत राजकीय पक्षांना त्यांच्या संपत्तीचा तपशील जाहीर करणे बंधनकारक आहे.

वरील अहवालानुसार भाजपची मालमत्ता दोन नंबरवर असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या सात पटीपेक्षा जास्त आहे. प्रादेशिक पक्षात समाजवादी पक्ष ५६३.४७ कोटी, तेलंगाना राष्ट्र समिती ३०१.४७ कोटी, अण्णा द्रविड मुनेत्र कळघम २६७.६१ कोटी असे तीन पहिले पक्ष आहेत. भाजपने दिलेल्या आकडेवारी नुसार त्यांच्या बँकेत ३२५३ कोटींच्या ठेवी आहेत, बसपच्या ६१८.८६ कोटी तर कॉंग्रेसच्या २४०.९० कोटींच्या ठेवी आहेत. त्याचबरोबर सात प्रमुख राष्ट्रीय पक्षांना ७४.२७ कोटींचे कर्ज सुद्धा आहे.