बिटिंग रिट्रीट मध्ये आज प्रथम १ हजार स्वदेशी ड्रोन शो

शनिवार म्हणजे २९ जानेवारी रोजी सायंकाळी दिल्लीच्या विजय चौकात होणाऱ्या बिटिंग रिट्रीट कार्यक्रमात यंदा प्रथमच १ हजार स्वदेशी ड्रोन १० मिनिटांचा शो सादर करत आहेत. रक्षा मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आझादी का अमृत महोत्सव स्वरुपात हा दिवस साजरा होत आहे. स्टार्टअप बोटलॅब डायनामिक्स तर्फे यावेळी प्रथमच एक हजार स्वदेशी ड्रोन आकाशात उडविण्याचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाबरोबरच प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता होणार आहे. कार्यक्रमाची सुरवात बिगुल वरून फन फेअर गीत वाजवून होईल आणि त्यानंतर सेनेचे विविध विभाग त्यांचे सादरीकरण करतील. त्यानंतर ड्रोन शो होईल. हा लाईट शोचा एक भाग असून असे प्रदर्शन करणारा भारत चौथा देश बनेल. यापूर्वी चीन, रशिया, आणि यु के मध्ये ड्रोन सादरीकरण केले गेले आहे असे केंद्रीय विज्ञान प्रौद्योगिकी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.