आता महाराष्ट्र महिला पोलिसांना आठ तास ड्युटी

पुणे, नागपूर आणि अमरावती मध्ये प्रायोगिक पातळीवर महाराष्ट्र महिला पोलिसांना आठ तासाची ड्युटी लागू केली गेल्यानंतर आता संपूर्ण राज्यात महिला पोलिसांना आठ तासाची ड्युटी लागू होत असल्याचे आदेश महाराष्ट्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जारी केले आहेत. महिला पोलिसांसाठी नवा छोटा कार्यदिवस प्रयोगात्मक आधारावर लागू केला गेला आहे. सर्वसाधारण पणे पुरुष आणि महिला पोलीस १२ तासाची ड्युटी करतात. पांडे यांनी गुरुवारी नवा आदेश जारी केला असून पुढील आदेश येईपर्यंत महिला पोलीस आठ तासाची ड्युटी करणार आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पोलिसांना घर आणि काम अश्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यांच्या नोकरी व खासगी आयुष्यात चांगले संतुलन राखता यावे यासाठी हा नवा प्रयोग केला जात आहे. असे असले तरी आपत्काल, सणासुदीच्या काळात महिला पोलिसांच्या कामाचे तास वाढविले जाऊ शकतात. पण हा निर्णय त्या त्या भागातील पोलीस अधीक्षकांनी घ्यायचा आहे असे समजते.