अमेरिकेच्या व्हाईट हाउस मध्ये फर्स्ट लेडी कडे आली पाहुणी

अमेरिकेचे अध्यक्षीय निवासस्थान व्हाईट हाउस मध्ये फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या घरी नवी पाहुणी आली आहे. शुक्रवारीच ही पाहुणी व्हाईट हाउस वर पोहोचली असून तिचे काही फोटो जिल बायडेन यांनी त्यांच्या ट्वीटर अकौंटवर शेअर केले आहेत. ही पाहुणी दुसरी तिसरी कुणी नसून एक मांजरी आहे. तिचे नाव विलो असे ठेवले गेले आहे.

जो बायडेन अध्यक्षीय निवडणूक प्रचारात उतरले तेव्हाच त्यांचे आणि पत्नी जिल यांचे प्राणीप्रेम सतत समोर येत होते. निवडणूक लढत असतानाच बायडेन यांनी व्हाईट हाउस मध्ये पाळीव प्राणी वापसीची वेळ जवळ येत असल्याचे संकेत दिले होते. तेव्हाच जिल बायडेन यांनी जो निवडणूक जिंकले तर मांजर घरी आणणार असल्याचे सांगितले होते. घरात प्राणी असणे आवडते असेही त्या म्हणाल्या होत्या. बायडेन यांच्या कडे सध्या दोन कुत्री आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र व्हाईट हाउस मध्ये कोणताही प्राणी आणला नव्हता.

अर्थात विली ही काही व्हाईट हाउस मध्ये मुक्काम टाकणारी पहिली मांजर नाही. माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनाही मांजरे आवडत आणि त्यांच्या विदेश मंत्र्याने त्यांना दोन मांजरे भेट दिली होती. त्यापूर्वी जॉन एफ केनेडी, जेराल्ड फोर्ड, जिमी कार्टर यांच्या कुटुंबात मांजरे होतीच. बिल क्लिंटन यांच्याकडे साक्स नावाची मांजर होती.

विशेष म्हणजे जॉर्ज बुश यांनी त्यांच्या मांजरीचे नाव इंडिया उर्फ विली ठेवले होते. त्याला भारतातून विरोध केला गेला होता आणि दक्षिणेकडील राज्यात याच्या निषेधार्थ बुश यांचा पुतळा जाळला गेला होता.