क्रिकेटपटू जाँटी ऱ्होडसला पंतप्रधान मोदींचे खास पत्र

द. आफ्रिकेचा माजी फलंदाज आणि जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होडस याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जानेवारी रोजी त्याला पाठविलेले खास पत्र सोशल मिडीयावर शेअर केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू क्रिस गेल आणि जाँटी ऱ्होडस यांना शुभकामना देणारी पत्रे प्रजासत्ताक दिनी पाठविली होती. जाँटी ऱ्होडस याने मोदींचे पत्र शेअर करताना त्यांना धन्यवाद दिले आहेत.

या पत्रात मोदी लिहितात,’ इतक्या वर्षात आपण भारत आणि भारतीय संस्कृती बरोबर गाढ नाते जोडले आहे. तुमचे हे भारत प्रेम तुम्ही आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवलेत तेव्हाच शाबित झाले आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत होण्यासाठी आपण विशेष दूत ठरला आहात.’ जाँटी ऱ्होडस पूर्वीपासूनच भारताकडे आकर्षित झाला असून येथील संस्कृतीने त्याला भुरळ घातली आहे. २०१५ मध्ये त्याच्या मुलीचा जन्म भारतात झाला तेव्हा त्याने मुलीचे नाव इंडिया ठेवले आहे.

जाँटी ऱ्होडस बाबत एक बाब अनेकांना माहिती नाही. तो उत्तम क्षेत्ररक्षक आहेच पण याच बळावर त्याने एकदा स्थानिक सामन्यात प्लेईंग इलेव्हनचा हिस्सा नसतानाही ‘मॅन ऑफ द मॅच’ होण्याची कामगिरी बजावली आहे. या सामन्यात तो एक्स्ट्रा फिल्डर म्हणून आला आणि त्याने विरुद्ध संघाच्या सात खेळाडूना कॅच आउट केले आणि तेथेच सामना फिरला होता. फिल्डिंगच्या जोरावर प्लेईंग इलेव्हन मध्ये सामील होण्याची कुवत असलेला तो एकमेव खेळाडू मानला जातो.