प्रथमच जेम्स बॉंड साठी अश्वेत कलाकाराचा होतोय विचार
हॉलीवूड मध्ये लोकप्रिय स्पाय फिल्म फ्रेन्चाईजी पुढचा जेम्स बॉंड निवडताना प्रथमच कुणा अश्वेत कलाकाराचा विचार करत असल्याचे समजते. ‘द सूसाईड स्क्वाड’ फेम अभिनेता इद्रीस एल्बा नावाचा हा कलाकार पुढच्या बॉंड पटात जेम्स बॉंड साकारू शकतो असे संकेत मिळाले आहेत. खरोखरच इद्रीसची जेम्स बॉंड साठी निवड झाली तर ४९ वर्षाचा इद्रीस जेम्स बॉंड साकारणारा सातवा कलाकार असेल. फ्रेंचाईजी प्रोड्यूसर बार्बरा ब्रोकोली व मायकेल जी विल्सन यांनी एका मुलाखतीत असे संकेत दिले आहेत. इद्रीस एल्बा प्रोड्यूसर, सिंगर, रॅपर, डी जे आणि उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो.
अर्थात पुढील जेम्स बॉंड चित्रपटाची अधिकृत कास्टिंग प्रोसेस अद्यापि सुरु झालेली नाही. जेम्स बॉंड ‘नो टाईम टू डाय’ ३० सप्टेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला आणि क्रेग डेनियल याचा हा शेवटचा बॉंडपट होता. जेम्स बॉंड भूमिकेसाठी कलाकार निवडीची प्रक्रिया अतिशय काटेखोर असून या निवडीत दिग्दर्शक, निर्माते सामील असतात. अनेकांची ऑडिशन होते, त्यातील दोन तीन जणांची निवड होते. मग स्क्रीन टेस्ट घेतली जाते. स्टंट असेसमेंट होते आणि मग कमिटी, निर्माते, स्टुडीओ, दिग्दर्शक मिळून निर्णय घेतात. ब्रोकोली कुटुंब यात महत्वाची भूमिका बजावते कारण ते फ्रंचाईजी मालक आहेत.
यानंतर संबंधित कलाकाराबरोबर करार होतो. त्याचे नियम कडक आहेत. जेम्स बॉंड भूमिकेत असेपर्यंत हा कलाकार अन्य प्रोजेक्ट स्वीकारू शकत नाही. त्याला लुक, बॉडी, वेट, स्टाईल अनेक वर्षे तशीच जपावी लागते. त्यासाठी खास डायट आणि वर्क आउट असतात. जेम्स बॉंडचे आत्तापर्यंत २५ चित्रपट आले आणि त्यासाठी १३७७९ कोटी रुपये खर्च केले गेले होते. मात्र त्यातून ५८९९९ कोटींची कमाई सुद्धा झाली आहे. डेनियल क्रेगने पाच जेम्स बॉंडपट केले आणि त्यातून त्याने ८९० कोटींची कमाई केली असे सांगतात. सर्वाधिक कमाई करणारा कलाकार असे क्रेगच्या नावावर गिनीज रेकॉर्ड सुद्धा आहे.