पत्नीने दिला ‘धोका’, पतीने प्रियकराकडून घेतली कोटींची नुकसान भरपाई

पत्नीने फसवल्यामुळे एका व्यक्तीने दुःखी होत थेट पत्नीच्या प्रियकराविरोधातच तक्रार दिली आहे. हे प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील आहे. केविन हॉवर्ड नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल केविनच्या बाजूने लागला असून, यात त्याला 6 कोटी रूपये नुकसान भरपाई देखील मिळणार आहे. केविनचे लग्न अपयशी ठरण्यात प्रियकराचा हात असल्याने कोर्टाने केविनच्या बाजूने निकाल दिला.

लग्नानंतर 12 वर्षांनी केविनला समजले की, त्याची पत्नी त्याला फसवत असून, तिचे दुसऱ्या पुरूषाबरोबर अनैतिक संबंध आहेत. केविनने यावर एका जुन्या कायद्याचा आधार घेत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली.

‘homewrecker’ कायद्यांतर्गत कोणताही महिला अथवा पुरूष एखाद्या व्यक्तीवर जाणूनबुजून आपल्या वैवाहिक आयुष्यात दखल देणे आणि पार्टनरपासून वेगळे करण्याचा आरोप करू शकतो. केविनने सांगितले की, लग्नाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी मी भांडण करत बसण्यापेक्षा थेट कोर्टात गेलो.

12 वर्ष पत्नीच्या संबंधांपासून अनभिज्ञ असलेले केविन आपले लग्न वाचवण्यासाठी मॅरिज काउंसिलच्या फेऱ्या मारायचे. काउंसिलचा काहीही फायदा न झाल्यामुळे अखेर केविन यांनी आपली पत्नी आपल्याला फसवत तर नाही ना, हे पाहण्यासाठी एका खाजगी गुप्तहेराची नेमणूक केली.

खाजगी गुप्तहेराची नेमणूक केल्यानंतर पत्नीचे सत्य केविनसमोर आले. त्यांच्या पत्नीचे ऑफिसमधील सहकर्मचाऱ्याबरोबरच संबंध होते. या सहकर्मचाऱ्याला केविन देखील चांगले ओळखायचे. तो सहकर्मचारी अनेकदा जेवणासाठी केविन यांच्या घरी येत असे. केविन त्याला आपल्या पत्नीचा चांगला मित्र समजत असे.

केविनने आपल्या पत्नीला घटस्फोट दिलेला आहे. मात्र न्यायालयाने सांगितलेली नुकसान भरपाई केविनला न दिल्यास पत्नी व प्रियकरावर कर्जाचा गुन्हा दाखल होईल.

 

Leave a Comment