डोकेदुखी कमी व्हावी, झोप पळावी, तरतरी यावी किंवा उत्साह वाढवा अश्या अनेक कारणांनी आपण अनेकदा कॉफी पितो. हीच कॉफी जर अधिक हेल्दी करून मिळत असेल तर सोन्याहून पिवळे होईल असे अनेकांना वाटत असेल. मग एक अगदी सोपा उपाय करून तुमची आवडती कॉफी तुम्ही अधिक हेल्दी बनवू शकता. त्यासाठी एवढेच करायचे की कॉफी घेताना त्यात एक चमचा तूप घालायचे. सध्या हा घी कॉफी किंवा बुलेट कॉफी ट्रेंड जोरात असून अनेक सेलेब्रिटी तसेच डायट कंट्रोल करणारे या कॉफीला प्राधान्य देताना दिसत आहेत.
जाणून घेऊया घी कॉफीचे फायदे
या कॉफी सेवनाचे अनेक फायदे सांगितले जात आहेत. काही लोकांच्या पोटाला कॉफी थोडी जड पडते त्यांच्यासाठी तूप कॉफीचे सेवन उपयुक्त ठरते. तूप घातल्याने पोटातील आतडी मऊ राहतात शिवाय पित्त कमी होते. तूप घालून कॉफी घेतल्यास त्याचा फायदा वजन कमी करण्यात होतो. वजन कमी करण्यासाठी लोक आहारातून फॅट पूर्ण वगळतात. त्याऐवजी स्मार्ट पद्धतीने हे फॅट शरीरात गेले तर वजन कमी होण्याचा वेग वाढतो. कॉफी सोबत तूप पोटात गेले तर भूक कमी लागते. शिवाय मीठ नसलेले आणि थोडे गोड अशी तुपाची चव कॉफीचा स्वाद अधिक वाढविते.
सकाळी अशी तूप घातलेली कॉफी घेतली तर तूप घालून केलेले पदार्थ पचविण्याचा त्रास पोटाला सहन करावा लागत नाही शिवाय कॉफीसोबत गेलेल्या १ चमचा तुपामुळे आवश्यक एनर्जी मिळते. हे मिश्रण मेंदूसाठी चांगले असून त्यामुळे नर्व्ह कनेक्शन चांगले राहते. मूड चांगला करणारी हार्मोन रिलीज होण्यास मदत मिळते. अर्थात या कॉफीचे सेवन प्रमाणात करणे केव्हाही शहाणपणाचे ठरते.