२५ जानेवारी, राष्ट्रीय मतदाता दिवस

भारतात दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय  मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ११ वा मतदाता दिवस देशभर साजरा केला जात आहे. २५ जानेवारी २०११ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी मतदाता दिवस साजरा करण्याचा शुभारंभ केला होता.

देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात होत असून मतदान तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकशाही देशात सरकार बनविण्यात मुख्य भूमिका मतदाराची असते. आपले बहुमोल मत देऊन मतदाता पाच वर्षासाठी नेत्यांना सत्ता देत असतात. पण भारतात मतदानाबद्दल जेवढी जागृती हवी तेवढी दिसत नाही. अनेक मतदार निवडणुकीत मतदान करत नाहीत.  मताचे महत्व कळण्याबाबत मतदारांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

१८ वर्षावरील व्यक्ती आपले मत देऊन देश, राज्याच्या विकासात नागरिक म्हणून असलेले त्यांचे कर्तव्य पूर्ण करू शकतात. मतदाता दिवस २५ जानेवारी रोजी साजरा करण्याचे कारण म्हणजे २५ जानेवारी १९५० या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. स्थापनेच्या ६१ व्या वर्षापासून हा दिवस मतदाता दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक कार्यक्रम केले जातात. पात्र मतदारांनी मत द्यावे म्हणून त्यांच्यात जागृती केली जाते तसेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदार यादीत नाव सामील करून मतदार ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम सुद्धा या दिवशी होतो. प्रत्येक निवडणुकीत मतदान करेन अशी शपथ मतदारांना दिली जाते.