यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन करोना सावटाखालीच

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात ३१ जानेवारी पासून राष्ट्रपतींच्या भाषणाने होत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही अधिवेशनावर करोनाची छाया असल्याने करोना नियमावली पाळून अधिवेशन घेतले जात आहे. दोन टप्प्यात हे अधिवेशन होणार आहे. दोन्ही सदनाच्या बैठका वेगवेगळ्या वेळी पाच पाच तास घेतल्या जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.

लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. सकाळी ११ वाजता त्याची सुरवात होईल. २ फेब्रुवारी रोजी राज्यसभेची बैठक सायंकाळी ४ ते ९ या वेळात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात करोना लक्षात घेऊन दोन्ही सदनाचा वापर सदस्यांना बसण्यासाठी होणार आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल या काळात होणार आहे.

२०२० मध्ये करोना प्रभावामुळे दोन्ही सभागृहांच्या बैठका वेगवेगळ्या वेळीच झाल्या होत्या तसेच २०२१ मध्ये सुद्धा अर्थसंकल्प सादर होताना अशीच व्यवस्था केली गेली होती. या वर्षी संसद कर्मचारी मोठ्या प्रमाणावर करोना संक्रमित झाले असून करोनाच्या तिसऱ्या लाटेत ८७५ कर्मचारी करोना बाधित झाले असल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान २८४७ चाचण्या संसद संबंधित लोकांच्या केल्या गेल्या असल्याचेही समजते. राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांना करोना संसर्ग झाला असून त्यांना करोनाचा संसर्ग दुसऱ्या वेळी झाला आहे असे समजते.