पुतीन यांना पाक भेटीचे इम्रान खान यांचे निमंत्रण

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर येणार असल्याचे संकेत मिळाली आहेत. त्यामुळे भारत रशिया संबंधांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. वास्तविक इम्रान खान यांनी पुतीन यांना पूर्वीच पाक भेटीचे निमंत्रण दिले होते पण फोन वरून निमंत्रण देण्याची ही इम्रान खान यांची पहिलीच वेळ आहे असे सांगितले जात आहे. रशियाचे प्रमुख नेते पाक भेटीवर जाण्याचा हा प्रसंग ३० वर्षानंतर येत आहे असेही बोलले जात आहे.

गतवर्षी रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव भारत भेट देऊन नंतर पाकीस्तान भेटीवर गेले होते. गेली दोन वर्षे पुतीन यांच्या पाकिस्तान भेटीची चर्चा होते आहे पण करोना आणि अन्य काही कारणाने हि भेट झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पुतीन यांच्याकडे काही भक्कम विक्री करण्यासारखे असेल तरच पाकिस्तान मध्ये जाण्याचा विचार ते करतील. इस्लामाबाद पाकिस्तान आणि रशिया गॅस पाईपलाईन करार घोषणा झाली असून या अब्जावधी डॉलर्स खर्चाच्या योजनेचा शिलान्यास पुतीन यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच वर्षी या योजनेचे काम सुरु करायचा विचार होत आहे.

वास्तविक २०१५ मध्ये या संदर्भातला करार झाला होता. मात्र रशियन कंपन्यांवर अमेरिकेने प्रतिबंध लादल्याने आणि अन्य काही कारणांनी ११२२ किमी लांबीच्या या पाईपलाईनचे काम सुरूच होऊ शकलेले नाही. पाईपलाईन मुळे पाकिस्तानला रशियातून थेट तेल व गॅस पुरवठा होऊ शकणार आहे. त्यामुळे खाडी देशांवर असलेले पाकिस्तानचे अवलंबित्व कमी होणार आहे असे समजते.