मार्च पर्यंत देशात करोना लसीकरण अंतिम टप्प्यात

करोना विरुद्ध लढाईसाठी गेल्या वर्षी लसीकरण अभियान सुरु केले गेले आणि आता हे अभियान अंतिम टप्प्यात असून मार्च पर्यंत ते पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. अर्थात याचा अंतिम निर्णय पुढील महिन्यात केल्या जाणाऱ्या सिरो सर्व्हेच्या रिपोर्ट नंतर घेतला जाणार आहे. देशात करोनाची तिसरी लाट आहे आणि त्यामुळे लसीकरण अधिक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. लसीकरणानंतर किती लोकांच्यात प्रतिपिंडे बनल्या याचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. गतवर्षी १६ जानेवारी पासून लसीकरण सुरु झाले आणि आत्तापर्यंत १६२ कोटी हून अधिक नागरिकांना करोना लस दिली गेली आहे.

सरकारी आरोग्य विभागाशी संबंधित तज्ञ सांगतात भारतात ओमिक्रोन कमी घातक बनण्याचे मुख्य कारण यशस्वी लसीकरण हे आहे. गेल्या वर्षात १८ वर्षांवरील ९२ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे तर ७२ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. या आयुर्वगातील बाकीच्यांचे लसीकरण होण्यासाठी ३० कोटी डोस हवेत. १५ ते १८ वयोगटाचे ४.१५ कोटी डोस दिले गेले आहेत आणि या गटाचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी १२ कोटी डोस हवेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षावरील लोकांना बुस्टर दिला जात असून आत्तापर्यंत ७५ लाखाहून अधिक डोस दिले गेले आहेत आणि ४ कोटी डोस अजून लागणार आहेत.

सिरम इंस्टीट्युट आणि भारत बायोटेक दर महिना ३० कोटी हून अधिक डोस पुरवठा करत आहेत. फेब्रुवारी पर्यंत देशाकडे लसीचा पुरेसा साठा असेल. फेब्रुवारी मध्ये चौथे सिरो सर्व्हेक्षण केले जात आहे. त्यात ९० ते ९५ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंडे आढळली तर लसीकरण मोहीम राबविण्याची गरज संपेल. आवश्यक त्यांनाच लस दिली जाईल आणि आता लस खुल्या बाजारात सुद्धा उपलब्ध केली जात आहे.