प्रजासत्ताक दिन परेड मधील ही तुकडी म्हणून आहे खास

येत्या २६ जानेवारी रोजी प्रतिवर्षी प्रमाणे राजपथावरून विविध पथके संचालनात सामील होत आहेत. कोविड मुळे पथकातील सदस्य संख्या यंदा कमी केली गेली आहे मात्र एका तुकडीतील सदस्य संख्या कायम राहिली आहे. भारतीय सेना जवान, निमलष्करी दल आणि अन्य पथके या परेड मध्ये नेहमीच सामील होतात मात्र त्यातील एक पथक फारच खास आणि जगातील एकमेव या प्रकारचे पथक आहे. गेली अनेक दशके हे पथक त्याच दिमाखात परेड मध्ये सहभागी होत आहे. हे पथक आहे सीमा सुरक्षा दलचे पथक.

याचे विशेष म्हणजे गुजराथ, राजस्थानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण उंटावर आरूढ होऊन येथील जवान करतात. जगातील असे हे एकमेव फौजी दल आहे ज्यांच्या खांद्यावर देशाच्या ६३८५ किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या रक्षणाची जबाबदारी आहे. या मार्गात दुर्गम वाळवंटे, नद्या, दरीखोरी आणि हिमाच्छादित प्रदेश आहे. यांना फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स या सार्थ नावाने ओळखले जाते.

राजपथावरील परेड मध्ये उंटावरून येणारे हे पथक १९७६ ला प्रथम सामील झाले.१९९० पासून सीमा सुरक्षा दलाचा बँड सुद्धा त्यांच्याबरोबर असतो. उंट हे वाळवंटातील जहाज. वाळूतून अन्य वाहने धावणे अवघड पण उंट सहज जाऊ शकतात. यामुळे या पथकातील जवानांना वाहना ऐवजी उंट दिले गेले आहेत. या प्रकारचे फौजी दल जगात अन्यत्र नाही. राजपथावरील परेड मध्ये खास सजविलेले १०० उंट सामील होतात. त्याच्यावर ६ फुटापेक्षा उंच असलेले जवान असतात. भरदार मिशा ही या जवानांची खास ओळख. त्यामुळे हे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेते.

परेड मध्ये सामील उंटाना नावे दिली गेली आहेत. उंटांच्या पथकाचे नेतृत्व करणार आहे सम्राट उंट. त्याच्यावर आरूढ असतील कमांडंट मनोहरसिह खोची. उंट ७० विविध प्रकारचे दागिने घालून येतील तर जवान केशरी फेटा, अचकन, ब्रिजेस, सिरपेच , कमरबंद, कलंगी सह असतील. बँडच्या धूनवर उंट कदमताल करतात त्याला तोड नाही. या दलात १००० उंट असून त्यांना जोधपुर येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पाच वर्षे झाल्यावर त्यांना परेड मध्ये नेला जाते. १५ वर्षे सेवा दिल्यावर उंट निवृत्त होतात.