क्रिस गेल, मिशेल स्टार्क सारखे बडे खेळाडू आयपीएल २०२२ पासून दूर
इंडिअन पैसा लीग असे टोपण नाव मिळालेल्या आयपीएल २०२२ च्या लिलावात यंदा कॅरेबियन क्रिस गेल, ऑस्ट्रेलियाचा पेस फायर मिशेल स्टार्क, इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूट, बेन स्टोक, जोफ्रा आर्चर, सॅम करन यांनी सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
आयपीएल २०२२ च्या लिलावात सामील होणाऱ्या खेळाडूंची यादी समोर आली असून जगभरातून १२१४ खेळाडूंनी या लिलावासाठी नोंदणी केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यात ८९६ भारतीय तर ३१८ विदेशी खेळाडू आहेत. मेगा लिलावात नव्या लखनौ आणि अहमदाबाद फ्रेन्चाईजी सहभागी होत आहेत. पण यंदा बडे खिलाडी यात दिसणार नाहीत. जो रूटने अगोदर आयपीएल साठी उपलब्ध असेल असे सांगितले होते पण ऑस्ट्रेलिया विरुध्द अॅशेश मालिकेत दारूण पराभव पत्करावा लागल्याने त्याने मन बदलले आहे असे समजते.
क्रिस गेल अनेक सिझन पंजाब किंग्स बरोबर जोडलेला होता. पण फ्रेन्चाईजीने त्याला जास्त संधी दिली नाही. हा गेलचा अवमान समजला जात आहे. त्यामुळे गेलने स्वतःला सिझन संपण्यापूर्वीच बाजूला करून घेतले होते. आयपीएल २०२२ च्या या सिझन मध्ये १८ देशातील ३१८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचे ५९, द.आफ्रिकेचे ४८, वेस्ट इंडीजचे ४१, श्रीलंका ३६, इंग्लंड ३०, न्यूझीलंड २९, अफगाणिस्थान २०, नेपाल १५, युएसए १४, बांग्लादेश ९,नामिबिया ५, ओमान व आयर्लंड प्रत्येकी ३, झिम्बावे २, भूतान, नेदरलंड, स्कॉटलंड, युएई प्रत्येकी १ खेळाडू आहेत. पूर्वीच्या आठ फ्रेन्चाईजीनी २७ खेळाडू रीटेन केले आहेत तर लखनौ आणि अहमदाबादने लिलावापूर्वीच ३-३ खेळाडू सामील करून घेतले आहेत.