करोना नियमपालन, पंतप्रधानांनी रद्द केला स्वतःचा विवाह

देशाचे पंतप्रधान असलो तरी आपण सामान्य नागरिकांप्रमाणेच आहोत याचा उत्तम आदर्श न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी स्वतःचा रविवारी नियोजित असलेला विवाह रद्द करून देशवासीयांसमोर ठेवला आहे. न्यूझीलंड मध्ये करोना ओमिक्रोनच्या केसेस वाढत चालल्याने अनेक नवे निर्बंध लागू केले गेले आहेत मात्र तेथील पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी स्वतःच नियम पालन करून नागरिकांसमोर आदर्श घालून दिला आहे. या कृतीतून त्यांनी देशातील नागरिकांनी करोना पासून सावध राहावे यासाठी प्रेरणा दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार न्यूझीलंड मध्ये झालेल्या एका विवाह समारंभात ओमिक्रोनच्या ९ केसेस सापडल्या आणि त्यामुळे नागरिक घाबरले. यामुळे देशात कॅम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला असल्याचे मानले जात आहे. एक कुटुंब ऑकलंड मध्ये झालेल्या विवाह समारंभात सामील होऊन विमानाने साउथ आईसलंडला परतले. त्यातील दोघांना करोना झाला, त्यानंतर करोना प्रतिबंध कडक करताना विवाहासारख्या समारंभात पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच सामील होता येईल असे नियम लागू केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून जेसिंडा यांनी त्यांचा नियोजित विवाह सध्यातरी रद्द केला असल्याची घोषणां केली.

जेसिंडा आणि क्लार्क गेफार्ड दीर्घ काळ एकत्र राहत असून त्यांनी रविवारी विवाह करण्याचे ठरविले होते. करोना कमी झाल्यानंतर विवाहाची नवी तारीख ते जाहीर करतील असे समजते. २०१७ मध्ये जेसिंडा यांनी सर्वात कमी वयाची पंतप्रधान बनण्याची कामगिरी बजावली होती. गतवर्षी ऑक्टोबर मध्ये त्या पुन्हा सत्तेवर आल्या आहेत. त्यांच्या कामाची खूपच तारीफ केली जाते. लेबर पार्टीला त्यांनी न्यूझीलंडच्या पार्टीच्या ५० वर्षाच्या इतिहासात सर्वात मोठा विजय मिळवून दिला आहे.