या देशात रेल्वेसाठी वापरात आहेत तीन रूळ

रेल्वेकडे  जगभरातील अनेक देशात लाईफलाईन म्हणून पाहिले जाते. दररोज हजारो प्रवासी रेल्वे प्रवास करतात. अन्य वाहनांच्या तुलनेत रेल्वे प्रवास स्वस्त असतो. बहुतेक ठिकाणी रेल्वेसाठी दोन रूळाचा मार्ग असतो. पण काही ठिकाणी रेल्वेसाठी तीन रूळ किंवा पटऱ्या आहेत यावर चटकन आपला विश्वास बसणार नाही. पण तुम्हाला खरोखर तीन रूळ बघायचे असतील तर फार लांब जाण्याची गरज नाही. आपल्या शेजारी बांग्ला देशात रेल्वेसाठी तीन रूळ पाहता येतात.

रेल्वे रूळ गेज नुसार बनविले जातात. विविध ठिकाणी या रुळांची रुंदी कमी जास्त असते. काही ठिकाणी रूळ अगदी अरुंद तर काही ठिकाणी खूपच रुंद असतात. यालाच अनुक्रमे नॅरो गेज आणि ब्रॉड गेज म्हटले जाते. बांग्ला देशात मात्र ड्युअल गेज रूळ आहेत. म्हणजे यात दोन ऐवजी तीन रूळ असतात. पूर्वी येथे फक्त मीटर गेजचा वापर होत होता. नंतर रेल्वे विस्तार करताना भारताप्रमाणेच त्यांना ब्रॉड गेजची गरज भासू लागली.

मीटर गेजचे ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करणे हे फार खर्चिक काम आहे. त्यामुळे बांग्ला सरकारने देशभर दूरवर पसरलेले मीटर गेज मार्ग कोणत्याही किमतीवर बंद करायचे नाहीत असे ठरविले. त्यामुळे येथे ड्युअल गेजचा ट्रॅक बनविला गेला. यामुळे दोन वेगवेगळ्या गेजच्या रेल्वे एकाच ट्रॅकवरून धावू शकतात. रेल्वे विभागात याला मिक्स गेज म्हटले जाते.

येथे मीटर आणि ब्रॉड गेज मिळून हा मार्ग तयार होतो. म्हणजे मीटर गेजच्या बाजूला जास्तीचा एक रूळ टाकला जातो. हा तिसरा रूळ कॉमन असतो. याचा वापर ब्रॉडगेज रेल्वे साठी होतो तसेच आतल्या दोन रुळांवरून मीटर गेज रेल्वे धावू शकते. बांग्लादेशप्रमाणे जगातील अन्य काही देशात सुद्धा असे ड्युअल गेज मार्ग वापरात आहेत.