या कार डिलिव्हरीसाठी करावी लागणार चार वर्षे प्रतीक्षा

सेमी कंडक्टर चिपची चणचण नाही , तसेच सप्लायचीही समस्या नाही तरी जगप्रसिद्ध जपानी वाहन निर्माती कंपनी टोयोटाच्या ग्राहकांना कंपनीची एका खास कार विकत घ्यायची असेल तर किमान चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे असे सांगितले जात आहे. टोयोटाच्या लोकप्रिय नव्या लँडक्रुझर एसयुव्हीची डिलिव्हरी आता नोंदणी करणाऱ्यांना चार वर्षानंतर मिळू शकणार आहे.

सेमी कंडक्टर चिप किंवा करोना मुळे सप्लाय चेन मध्ये येत असलेल्या समस्या जगभरात ऑटो उद्योगासाठी डोकेदुखी ठरल्या असून त्यामुळे वाहन उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. भारतासह जगातील सर्व ऑटो कंपन्यांची वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना यामुळे पसंतीचे वाहन मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. टोयोटा कंपनीला ग्लोबल ट्रेंड प्रमाणे चिप शॉर्टेज समस्या नाही. पण जपान मध्ये करोना संसर्ग सातत्याने वाढता राहिल्याने कंपनीला त्यांच्या ११ प्लांट मधील उत्पादन कमी करावे लागले आहे. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार लँड क्रुझर जपान मध्येच नाही तर जगभर लोकप्रिय आहे आणि तिला प्रचंड मागणी आहे.

१९५१ मध्ये प्रथम लाँच केलेली ही गाडी सर्वात दीर्घ काळ विकले जात असलेले कंपनीचे वाहन आहे. गतवर्षी ऑगस्ट मध्ये कंपनीने १ कोटी ६ लाख लँड क्रुझर विकल्या होत्या. मात्र सध्या या गाडीचे उत्पादन कमी होते आहे. तसेच सप्लाय चेन मध्ये सुद्धा काही समस्या निर्माण झाल्या आहेत. करोना मुळे साउथ इस्ट आशिया मधील सुटे भाग बनविणाऱ्या कारखान्यातील उत्पादन प्रभावित झाले आहे. खास करून लँड क्रुझर आणि लेक्ससच्या उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम झाला असल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगितले जात आहे.