प्रियांका, निक जोनास बनले आईबाबा

ग्लोबल स्टार म्हणून प्रसिद्धीच्या झोतात असलेली देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास आता नवीन भूमिकेत आले आहेत. हे दोघेही सरोगसीच्या माध्यमातून एका चिमुकल्या बाळाचे आईबाबा बनले आहेत. मात्र हे बाळ मुलगा आहे कि मुलगी याचा खुलासा झालेला नाही. प्रियांकाने स्वतः शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मिडीयावर ही गुड न्यूज शेअर केली आहे. पती निक जोनासला टॅग करून प्रियांकाने त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे म्हटले आहे. या पोस्ट मध्ये ती म्हणते, ‘ खूप आनंदात आहे. सरोगसीच्या माध्यमातून जन्मास आलेल्या नव्या बाळाचे आमच्या घरी स्वागत. या खास प्रसंगी आमच्या खासगीपणाची जाणीव ठेवाल अशी अपेक्षा. आता आम्हाला परिवारावर लक्ष द्यायचे आहे.’

प्रियांकाच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि बॉलीवूड कलाकारांनी प्रतिक्रियांचा पाउस पाडला आहे. सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे. एका मुलाखतीत बोलताना प्रियांकाने परिवार वाढविणार असल्याचे संकेत दिले होते. २०१९ च्या एका मुलाखतीत सुद्धा तिने घर खरेदी आणि मुले तिच्या ‘टू डू’ लिस्ट मध्ये असल्याचे म्हटले होते. उदयपुरच्या उमेद भवन मध्ये प्रियांका आणि निक जोनास यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. हिंदू आणि क्रिश्चन अश्या दोन्ही पद्धतीने हा विवाह केला गेले होता आणि त्यामुळे तो चर्चेत आला होता.

प्रियांकाचे नाव टाईम मॅगेझिनच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती आणि फोर्ब्सच्या १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये तिला पद्मश्री सन्मान दिला आहे.