अंटार्टीकावर करोनाची दस्तक

करोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरीयंट चा कहर जगभर सुरु आहेच. पण करोना आगमनाच्या दोन वर्षानंतर आता प्रथमच करोनाने अंटार्टीकाच्या बर्फाळ प्रदेशात दस्तक दिली आहे. या खंडावर ६९ करोना संक्रमित सापडले आहेत. आर्जेन्टिनाच्या संशोधन केंद्रातील ४५ वैज्ञानिक आणि येथे तैनात असलेल्या सैन्यातील २४ अधिकारी यांना करोना संसर्ग झाला आहे. संक्रमितांपैकी नऊ लोकांनी करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही असे समजते. हेलीकॉप्टर मधून संक्रमिताना ब्युनास आयर्सला आणले जात आहे.

दरम्यान कालच्या दिवसात संक्रमणाचे जागतिक रेकॉर्ड नोंदविले गेले असून जगभरात ३५.५४ लाख नव्या केसेस आढळल्या आहेत. कालच्या दिवसात मृतांची संख्या ९०७४ वर गेली आहे. नवीन दैनिक संक्रमणात अमेरिका आघाडीवर असून येथे एका दिवसात ७.२७ लाख नवे संक्रमित सापडले आहेत. फ्रांस मध्ये ४.३६ लाख संक्रमित एक दिवसात सापडले आहेत. पण फेब्रुवारीत नवीन केसेस कमी येतील आणि करोना नियम शिथिल केले जातील असे फ्रांसच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

ऑस्ट्रेलियाने फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेपासून लस घेणे अनिवार्य केले असून संसदेने या संदर्भात मांडल्या गेलेल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. नेपाळ, जपान येथेही संक्रमणाचा वेग वाढता असल्याने नियम सक्ती केली गेली आहे. जर्मनी मध्ये शुक्रवारी १,४०,१६० नव्या केसेस आल्या असून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत रोज ४ ते ६ लाख नव्या केसेस येतील असा अंदाज जर्मनीच्या आरोग्य विभागाकडून वर्तविला गेला आहे.