म्हणून नेस्लेला बाजारातून मागे घ्यावी लागली कीटकॅट

स्वित्झर्लंडची बहुराष्ट्रीय कंपनी आणि दुघ पावडर, मॅगी सारखे दैनिक वापराचे सामान विकणाऱ्या नेस्ले इंडियाने गुरुवारी कीटकॅट चॉकलेटचे काही खास बॉक्स बाजारातून काढून घेतले गेल्याचे जाहीर केले आहे. या पुड्यांवर पुरीच्या भगवान जगन्नाथ, बलराम आणि माता सुभद्रा यांच्या प्रतिमा छापल्याने सोशल मिडीयावर कंपनी विरोधात मोठा हंगामा झाला. ते लक्षात घेऊन कंपनीने अश्या प्रतिमा असलेली पॅकेट बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

नेस्ले इंडियाच्या भारतातील युनिट मधील अधिकारी माहिती देताना म्हणाले, पुरी भगवान प्रतिमा पाकीटावर छापल्याने नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्यांच्या संवेदनशिलतेची जाणीव आम्हाला आहे. न कळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल खेद आहे. वास्तविक २०२१ मध्येच ही पाकिटे बाजारातून वापस घेतली गेली आहेत. अश्या प्रतिमा छापण्यामागे देशातील सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळांची ओळख पट्टचित्रातून करून द्यावी असा उद्देश होता. यामुळे ओरिसा राज्याची संस्कृती यातून प्रतीत केली गेली होती.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा कंपनीने एप्रिल मध्ये आलेल्या कीटकॅट बॅचवर मणिपूरचे किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान मेघालय मध्ये असल्याचे दाखविले होते आणि त्याबद्दल कंपनीला माफी मागावी लागली होती.