भारतात नोकरी बदलाचे वारे जोरात

करोनाच्या दोन वर्षात भारतात अनेक कार्यालये बंद राहिली, घरातून कामाचा ट्रेंड सुरु झाला आणि बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले होते. गेल्या दोन वर्षात परिस्थिती वेगाने बदलली आणि आता त्यातून निर्माण झालेला नवा ट्रेंड ठळकपणे पुढे येऊ लागला आहे. या काळात अनेकांनी त्यांचा जॉब, करिअर याविषयी नव्याने विचार केला असल्याचे एका ताज्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. भारतात दर ५ मागे ४ कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत आणि याला ‘द ग्रेट रीशफल ट्रेंड’ असे म्हटले जात आहे.

अमेरिकेत या दोन वर्षाच्या काळात आणि त्यातही २०२१ मध्ये सुमारे ३.४ कोटी लोकांनी नोकरीचा राजीनामा दिल्याचे समोर आले होते. त्याला ‘द ग्रेट रेझीग्नेशन ट्रेंड’ म्हटले गेले होते. त्याच धर्तीवर आता भारतात करोडो कर्मचारी नोकरी बदल्याच्या तयारीला लागले आहेत. लिंकडेन व युके मार्केट रिसर्चर सेसवाईड यांनी हे सर्व्हेक्षण केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्येच टेक्सासचे प्रोफेसर अँथनी क्लॉटन यांनी करोना काळात लाखो लोक राजीनामे देतील असा अंदाज वर्तविला होता. इतक्या प्रचंड प्रमाणात लोकांनी राजीनामे दिल्याने या ट्रेंडला ‘द ग्रेट रेझीग्नेशन’ म्हटले गेले होते. यात अमेरीकेत सर्वाधिक लोकांनी राजीनामे दिले होतेच पण जर्मनी, व्हीएटनाम आणि अन्य काही देशात सुद्धा हाच ट्रेंड दिसला होता.

भारतात लिंकडेनच्या सर्व्हेक्षणानुसार ८२ टक्के कर्मचारी नोकरीत बदल करण्यास उत्सुक आहेत. त्यात फ्रेशर्स आणि जनरेशन झेडचे प्रोफेशनल मोठ्या प्रमाणावर आहेत. नोकरी बदलामागे काम आणि परिवारला द्यावा लागणारा वेळ याचे गणित बिघडणे, कमी पगार, चांगल्या नोकरीची महत्वाकांक्षा अशी कारणे आहेत. शिवाय करोना मुळे लोकांच्यातील आत्मविश्वास कमी होणे, आपल्या क्षमतेवर शंका अशीही काही कारणे त्यामागे असल्याचे सांगितले जात आहे.