आमच्यावर लावा कर, जगातील अब्जाधीशांची अजब मागणी

जगात कुठेही गेलात तरी ज्यांना सरकारचा कर या ना त्या स्वरुपात भरावा लागतो ते सर्व करदाते आपला कर कमी कसा करता येईल किंवा कर कसा वाचवता येईल यासाठी प्रयत्न करतात. पण जगातील १०२ अब्जाधीशांनी त्यांच्यावर जादा कर लावला जावा अशी अजब मागणी वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या देवास येथे सुरु असलेल्या परिषदेत एक पत्र लिहून केली आहे.

यामागचे कारण मात्र चांगला हेतू हे आहे. या धनकुबेरानी त्यांच्यावर जादा संपत्ती कर लावला गेला तर त्यातून २.५ ट्रिलीयन डॉलर्स जमा होतील आणि त्या पैशातून सर्व जगभर करोना लस देता येईल. २.३ अब्ज लोकांना गरिबी रेषेच्या वर आणता येईल असे म्हटले आहे. हे १०२ धनकुबेर पत्रात म्हणतात, ‘जगात सध्याची कर प्रणाली योग्य नाही.’ या पत्रावर सही करणाऱ्या श्रीमंतात अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, डेन्मार्क, नॉर्वे, ऑस्ट्रिया, नेदरलंड आणि इराण देशातील श्रीमंत आहेत.

त्यापूर्वी ऑक्सफॅमने याच आठवड्यात जारी केलेल्या एका अहवालानुसार करोनाच्या दोन वर्षाच्या काळात जगात १० सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती दुप्पट झाल्याचे आणि दुसरीकडे असमानता व गरिबी वाढल्याचे नमूद केले होते. त्यामुळे श्रीमंतांवर अधिक कर लावून मिळणारा पैसा करोना लसीकरण, गरिबी निर्मुलनासह गरीब, मध्यमवर्गी देशातील ३.६ अब्ज नागरिकांना युनिव्हर्सल हेल्थ केअर व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी वापरता येऊ शकतो असे म्हटले जात आहे. प्रोग्रेसिव्ह कर लावण्याने दरवर्षी ३.६ लाख कोटी डॉलर्स जमा होऊ शकतात त्यात श्रीमंतांवर लावण्यात येणाऱ्या १० टक्के लेव्हीचा समावेश आहे.