अमरजवान ज्योती,राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्योतीत विलीन
इंडिया गेटची ओळख बनून राहिलेली अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी आज शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील ज्योतीमध्ये विलीन केली जात आहे. दुपारी साडेतीन वाजता अमरजवान ज्योतीची मशाल राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्योती मध्ये समाहित केली जाणार आहे. भारतीय सेना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली हा समारोह साजरा होत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये भारत पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे अगोदरच एक ज्योत प्रज्वलित केली गेली होती. त्यात अमर जवान स्मारक ज्योग संमिलीत केली जात आहे.
अमर जवान ज्योत १९७२ मध्ये भारतीय सेनेने १९७१ च्या लढाईत पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे प्रतिक आणि शहीद जवानाची आठवण म्हणून प्रज्वलित केली गेली होती. राष्ट्रीय युद्ध स्मारक, शहीद नायकांची स्मृती आणि स्वातंत्र्यनंतर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांची आठवण म्हणून उभारले गेले असून २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले होते. येथे २५९४२ शूर सैनिकांची नावे सुवर्णअक्षरात लिहिली गेली आहेत. इंडिया गेट ब्रिटीश काळात १९१४ ते २१ मध्ये प्राण गमावलेल्या ब्रिटीश भारतीय सैनिकांची आठवण म्हणून बांधले गेले होते. याच परिसरात शेजारी १९७२ मध्ये ७१ च्या युद्धात शहीद सैनिकांची आठवण म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमर जवान ज्योत प्रज्वलित केली होती.