सौदी पाठोपाठ सहारा वाळवंटात हिमवर्षाव

आफ्रिकेतील सहारा वाळवंटाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या अल्जिरीयाच्या आइन सेफारा मध्ये प्रचंड हिमवर्षाव झाला असून येथील वाळूच्या टेकड्या बर्फाने झाकल्या गेल्याचे अद्भुत दृश्य दिसते आहे. गेल्या ४२ वर्षात हा पाचवा हिमवर्षाव आहे. यापूर्वी गेल्या ६ वर्षात चार वेळा या भागात बर्फ पडले होते. १९७९, २०१६,२०१८,२०२१ मध्ये येथे हिमवर्षाव नोंदला गेला आहे. जगातले हे सर्वात उष्ण वाळवंट आहे. हिमवर्षावामुळे येथील तापमान उणे दोन डिग्रीवर गेले आहे. अल्जेरिया येथे सध्या गार वाऱ्यांचे दबावक्षेत्र आहे आणि त्यामुळे बर्फ पडत असल्याचे हवामान तज्ञ सांगत आहेत.

उन्हाळ्यात या भागाचे तापमान ५८ डिग्री पर्यंत जाते. वैद्यानिकांच्या मते पुढच्या १५०० वर्षात हे वाळवंट हिरवेगार होईल. याचे कारण म्हणजे पृथ्वी या काळात तिच्या अंशापासून २२ ते २२.५ डिग्रीने झुकणार आहे. हे वाळवंट ३६ लाख चौरस किमी क्षेत्रफळाचे असून हा आकार चीन देशाइतका आहे. बीबीसीच्या रिपोर्ट नुसार येथील तापमान यंदा खूपच घसरले आहे. हवामान तज्ञ निक बेरी यांच्या म्हणण्यानुसार ते उणे दोन वर गेले आहे. परिणामी येथील लोक धास्तावले आहेत.

२०१६ मध्ये बर्फवर्षाव झाले तेव्हा सुद्धा येथील रहिवासी घाबरले होते. कारण त्यापूर्वी १९७९ मध्ये बर्फवर्षाव झाला तेव्हा आजची तरुण पिढी जन्माला आलेली नव्हती. हे निसर्गाचे तांडव मानले जात आहे. या वर्षाच्या सुरवातीला वाळवंटी देश सौदी अरेबिया मध्येही हिमवर्षाव झाला आहे.