जकार्ता बुडतेय, नुसंतारा होणार इंडोनेशियाची नवी राजधानी

सुमारे ७३ वर्षांपासून इंडोनेशियाची राजधानी असलेले जकार्ता समुद्रात हळूहळू बुडू लागल्याने देशाला नवी राजधानी मिळणार आहे. इंडोनेशिया सरकारने नव्या राजधानीसाठीचा प्रस्ताव मंगळवारी संसदेत मंजुरीसाठी आणला होता त्याला संसदेने मंजुरी दिली आहे. नवी राजधानी बोर्नियो बेटावर उभारली जाणार असून तिचे नाव नुसंतारा असेल असे समजते. या राजधानीच्या उभारणीसाठी राष्ट्रीय खजिन्यातून ३३ अब्ज डॉलर्स खर्च केले जाणार आहेत. राष्ट्रपती जोको विडोडो यांनी २०१९ मध्ये प्रथम नव्या राजधानीवर विचार करण्यासाठी विशेष कमिटी नेमली होती.

बोर्नियो या निसर्गसुंदर बेटावर २५६,१४२ हेक्टर परिसरात नवी राजधानी उभारली जाणार आहे. या बेटावर अतिशय सुंदर दाट जंगले, नद्या आहेत. द गार्डियनच्या रिपोर्ट नुसार नव्या राजधानीचे बांधकाम सुरु झाले कि येथील हिरवाई कमी होणार आहे त्याचा इको सिस्टीमवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रदूषण वाढ होईल, पावसाळी जंगले घटतील आणि वन्य प्राणी पक्षी संकटात येतील असेही या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे.

दुबई, सिंगापूरच्या धर्तीवर वर्ल्ड सिटी व्हिजन नुसार नवी राजधानी उभारली जाणार आहे. सध्याच्या राजधानी मध्ये म्हणजे जकार्ता येथे १ कोटी लोकसंख्या आहे आणि जगातील हे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. वाहतूक व्यवस्था अतिशय खराब असून मंत्री सुद्धा मंत्रालयात वेळेवर पोहोचू शकत नाहीत असे सांगितले जाते. येथे व्यापार व्यवसाय वाढीला आत्ता जागा नाही. शिवाय हे शहर हळू हळू समुद्रात बुडते आहे. २०५० पर्यंत या शहराचा मोठा भाग समुद्रात बुडेल असा अंदाज आहे. या ठिकाणी १३ नद्या असून मोठ्या भागात दलदल आहे आणि पुराचा सतत धोका आहे. खराब वाहतूक व्यवस्थेमुळे देशाला दरवर्षी ६.८ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागते असेही समजते.