आनंद महिन्द्रांची वचनपूर्ती, अवनी लेखराला दिली खास एक्सयुव्ही ७००

टोक्यो पॅरालीम्पिक मध्ये गोल्ड मेडल विजेती अवनी लेखरा हिला वचन दिल्याप्रमाणे महिंद्र अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी गोल्ड एडिशन खास कस्टमाईज एक्सयुव्ही ७०० भेट दिली आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या पुढच्या दोन्ही सीट कस्टमाईज आहेत. त्यामुळे दिव्यांग प्रवासी गाडीत सहज चढू उतरू शकतात. ऑगस्ट  २०२१ मध्ये आनंद महिन्द्र यांनी अवनी साठी खास एक्सयुव्ही भेट देणार असल्याचा वादा केला होता. अवनीने महिला १० मीटर एआर स्टँडिंग एसएचआय मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. शुटींग पॅरालीम्पिक स्पोर्ट्स मध्ये भारताचे हे पहिले गोल्ड मेडल असून अवनीने २४९.६ मीटरचे नवे पॅरालीम्पिक रेकॉर्ड नोंदविले आहे.

या खास एक्सयुव्हीच्या  पुढच्या दोन्ही सीट सहज मागे पुढे होतात तसेच ही खास सीट एक्सयुव्हीच्या दरवाजातून बाहेर येऊन खाली झुकते. दिव्यांग व्यक्तींना जास्त उंचीच्या वाहनात बसायला अडचण होते हे लक्षात घेऊन या सीट बनविल्या गेल्या आहेत. यात व्हीलचेअरवर बसून व्यक्ती आत बसू शकते आणि उतरू शकते. यापूर्वी नीरज चोप्रा आणि सुमित अन्तील यानाही एक्सयुव्ही ७०० गोल्ड एडिशन दिल्या गेल्या आहेत.

या खास गाडीच्या सीटचे डिझाईन उपाध्यक्ष आणि चीफ डिझाईन ऑफिसर प्रताप बोस यांनी केले आहे. अवनी साठी मिडनाईट ब्लॅक शेडची गाडी, आत बाहेर गोल्डटच सह दिली गेली आहे. या एक्सयुव्हीच्या फेंडर व टेलगेटवर अवनीचे रेकॉर्ड आकडा सोनेरी अक्षरात आहे.

महिंद्राच्या एक्सयुव्ही ७०० ची एक्सशो रूम किंमत १२.९५ लाख असून कंपनीची ही सर्वात महाग एक्सयुव्ही आहे. या वाहनाला तगडे सुरक्षा फीचर्स दिले गेले आहेत.