जगात या प्राण्यांच्या दुधाचेही होते सेवन

माणसासाठी दुध पिणे आरोग्यदायी मानले गेले आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी रोज दुध पिण्याचा सल्ला दिला जातो. जगात बहुतेक देशात गाय आणि म्हैस यांचे दुध अधिक प्रमाणात वापरले जाते. मात्र इतर अनेक अन्य प्राणी सुद्धा जगभरात दुग्ध उत्पादनासाठी पाळले जातात याची माहिती फारशी वाचनात येत नाही. गाईचे दुध सर्वात उत्तम मानले गेले असून जगात ८५ टक्के वापर गाईच्या दुधाचा होतो. त्या खालोखाल म्हशीचे दुध वापरले जाते. पण बकरी, उंट, गाढव, घोडी, हरण आणि याक यांचे दुध ही वापरले जाते.

जगात दोन टक्के बकरीचे दुध वापरले जाते आणि सर्वात महाग दुध गाढवीणीचे असते. हे दुध ५ ते १० हजार रुपये लिटरने विकले जाते. त्याचा वापर प्रामुख्याने औषधी कारणासाठी केला जातो. भारतात सुद्धा गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी आहे.

सोमालिया, केनिया मध्ये तसेच भारतात राजस्थान राज्यात उंटपालन केले जाते. उंटाचे दुध सुद्धा अतिशय पौष्टिक आणि शरीराला बळ देणारे मानले जाते. उंटीण दिवसाला ५ ते २० लिटर दुध देते. गाईप्रमाणेच या दुधाची चव असते. मंगोलिया मध्ये घोडीचे दुध वापरतात त्याला कुमीस म्हणतात. उत्तम प्रजातीच्या घोड्यांचे पालन येथे केले जाते आणि हिवाळ्यात या दुधाचे सेवन अतिशय फायदेशीर असते असे सांगतात. हे चवीला थोडे आंबट असते त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून ते वापरले जाते.

हिमालयात याक पाळले जातात. त्यांचे दुध सुद्धा वसा आणि प्रोटीन्स अधिक असलेले आहे. त्यापासून लोणी बनवितात. या दुधालाही चांगली मागणी आहे. याक हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात अधिक दुध देतात. हरणाचे दुध दुर्लभ आहे मात्र स्कँडेनेविया देशात हरिणाच्या दुधाला खूप मागणी आहे. येथे बाराशिंगाच्या दुधाचा वापर केला जातो. नेहमीच्या दुधापेक्षा यात फॅटचे प्रमाण २० टक्के अधिक असल्याने ते मलईदार असते. जिराफ या प्राण्याचे दुध सुद्धा वापरले जाते. पण हे दुध फार पौष्टिक नाही त्यामुळे आदिवासी भागातच हे दुध वापरले जाते.