मुकेश अंबानींच्या रिलायंसची रोबोटिक्स मध्ये एन्ट्री

देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायंस समूहाचा व्यवसाय विस्तार ई कॉमर्सपासून उर्जा क्षेत्रापर्यंत आहेच . आता त्यात रोबोटिक्स क्षेत्राची भर पडत आहे. भारतीय रोबोटिक स्टार्टअप मध्ये रिलायंस रिटेलने पाउल टाकले असून स्थानिक रोबो कंपनी अॅडव्हर्ब टेक मध्ये १३.२ कोटी डॉलर्स म्हणजे ९८३ कोटी रुपये गुंतवून ५४ टक्के शेअर खरेदी केली आहे.

अॅडव्हर्ब टेकचे सहसंस्थापक आणि सीईओ संगीत कुमार यांनी रिलायंस, अॅडव्हर्ब टेकचे सर्वात मोठे शेअरधारक झाले असल्याचे सांगितले. ते म्हणाले रिलायंस डिजिटल वेअरहाउस मध्ये ऑटोमेशन लागू करण्याची मोठी योजना आखत असून येत्या दोन वर्षात शेकडो जागी वेअरहाउस विस्तार करत आहे. अश्या जागी रोबोटिक्स सिस्टीम प्रभावी ठरते. अॅडव्हर्ब टेक स्वतंत्र कंपनी म्हणूनच काम सुरु ठेवणार आहे.

संगीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायंस कडून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग परदेशात व्यवसाय विस्तार करण्यासाठी आणि नोयडा येथे मोठे रोबो उत्पादन केंद्र स्थापनेसाठी करणार आहे. कंपनीचा नोएडा येथे अगोदरच एक प्रकल्प आहे. तेथे दरवर्षी १० हजार रोबो तयार होतात. यापूर्वीही रिलायंसला वेअरहाउस साठी कंपनीने डझनावारी रोबो पुरविले आहेत असेही समजते.