भारतरत्न पुरस्काराविषयी काही खास

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वात मोठा नागरी सन्मान ‘भारतरत्न ‘ पुरस्कार दिला जातो. अर्थात दरवर्षी हा पुरस्कार द्यायलाच हवा असे बंधन नाही. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय आणि असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि त्याची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींना करतात. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी २ जानेवारी १९५४ मध्ये भारतरत्न संस्थापित केले होते. एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना हा सन्मान देता येतो. हा पुरस्कार म्हणजे राष्ट्रपतींच्या सहीची एक सनद आणि एक पदक या स्वरूपाचा आहे. यात पैसे किंवा मानधन दिले जात नाही.

सुरवातीला जेव्हा हा पुरस्कार दिला गेला तेव्हा त्यात ३५ एमएमचे गोल सुवर्णपदक, त्यावर सूर्याची प्रतिमा आणि खाली हिंदी भाषेत भारतरत्न अशी अक्षरे होती. आता पिंपळपानावर प्लॅटीनमचा सूर्य, चांदीत भारत रत्न अशी अक्षरे आणि तळात पुष्पहार असे पदकाचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत ४८ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला व्हीआयपी दर्जा मिळतो. ते संसदेत उपस्थित राहू शकतात, संसद कामात सहभागी होऊ शकतात.

भारतरत्न व्यक्तींना आयकर भरण्यातून सूट मिळते. प्रजासत्ताक दिनी ते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात. विमान, ट्रेन, बस प्रवासाची मोफत सुविधा मिळते. त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा मिळतो. यापूर्वी या पुरस्कारात क्रीडा क्षेत्राचा समावेश नव्हता तो २०११ मध्ये केला गेला. तसेच यापूर्वी मरणोत्तर पुरस्कार दिला जात नव्हता, त्यात १९६६ मध्ये बदल केला गेला. १३ जुलै ते २६ जानेवरी ८० पर्यंत हा पुरस्कार निलंबित केला गेला होता.

क्रीडा क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळविणारा सचिन तेंडूलकर सर्वात लहान वयाचा होता तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वयाच्या १०० व्या वर्षी हा पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला होत्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना १९९२ मध्ये मरणोत्तर भारतरत्न दिले गेले पण त्याविरोधात जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यावर त्यातील मरणोत्तर शब्द काढला गेला. कारण त्यावेळी नेताजींच्या मृत्यूबद्दल वाद सुरु होता.

१९८७ मध्ये खान अब्दुल गफार खान, १९९० मध्ये द.आफ्रिकेचे नेल्सन मंडेला, मदर तेरेसा यां परदेशी व्यक्तींना भारतरत्न दिले गेले आहे.