मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इतिहासातील मोठे डील, अॅक्टीव्हीजन ब्लीझार्ड ची केली खरेदी

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या ४६ वर्षांच्या इतिहासातील मोठे डील केले असून अमेरिकन गेमिंग दुनियेतील दिग्गज कंपनी अॅक्टीव्हीजन ब्लीझार्डची खरेदी केली आहे. प्रसिद्ध कॉल ऑफ ड्युटी आणि कॅन्डी क्रश सारख्या खेळांची निर्माती अॅक्टीव्हीजन ब्लीझार्ड मायक्रोसॉफ्टने ६८.७ अब्ज डॉलर्स म्हणजे ५.१४ लाख कोटींना खरेदी केली. प्रती शेअर ९५ डॉलर्स दराने ही खरेदी झाल्याचे सांगितले गेले असून यामुळे मायक्रोसॉफ्टला मोबाईल गेमिंग सेक्टर मधील त्यांची भागीदारी वाढविण्यास मदत होणार आहे. या खरेदीने मायक्रोसॉफ्ट गेमिंग जगातील तिसरी मोठी कंपनी बनली आहे. या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर टेन्सेंट आणि दोन नंबरवर सोनी आहे.

अॅक्टीव्हीजन ब्लीझार्डच्या जगभरातील स्टुडीओ मध्ये १० हजार कर्मचारी काम करत आहेत. मायक्रोसॉफ्टला या अधिग्रहणामुळे ४० कोटी मासिक गेमिंग युजर्स मिळणार आहेत. अॅक्टीव्हीजन ब्लीझार्ड १९७९ मध्ये स्थापन झाली होती. गिटार हिरो, स्कायलँडर्स, डेस्टिनी, क्रॅश बँडीक्युट, टोनी होक स्केट बोर्डिंग असे अनेक गेम्स या कंपनीने बाजारात आणले आणि त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली आहे.