नव्या वर्षात लिलाव बोली जिंकून धोनीची व्हिंटेज स्टेशन वॅगनची खरेदी

प्रीमियम प्रो ओन्ड म्हणजे थोडक्यात सेकंडहँड कार डीलर बिग बॉय टॉइजने नुकत्याच केलेल्या ऑनलाईन लिलावात टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माहीने १९७१ लँडरोव्हर सिरीज ३ स्टेशनवॅगन साठी सर्वाधिक बोली लावली आणि ही स्टेशन वॅगन रांची येथील आपल्या गॅरेज मध्ये सामील केली असल्याचे वृत्त आहे. धोनीने या स्टेशनवॅगन साठी किती रक्कम मोजली याचा खुलासा अजून झालेला नाही. मात्र अगोदरच अनेक अलिशान कार्स आणि बाइक्सचा संग्रह केलेल्या धोनीच्या संग्रहात नवी एन्ट्री झाली आहे हे नक्की.

या लिलावात अन्य १९ व्हिंटेज कार्स सामील होत्या. त्यात रोल्स रॉयस, कॅडीलॅक, ब्यूक, शेवर्ले, ऑस्टीन, मर्सिडीज यांचा समावेश होता. पण ही लँडरोव्हर दुर्मिळ आहे कारण या गाड्या भारतात कमी संखेनेच आल्या होत्या. शानदार पिवळ्या रंगाची ही स्टेशनवॅगन तिच्या जमान्यातील खास आहे. कंपनीने ४,४०,००० युनिट १९७१ ते १९८५ या काळात बनविली होती. दोन मॉडेल मध्ये या स्टेशनवॅगन होत्या.

एकात २.३ लिटरचे चार सिलिंडर पेट्रोल इंजिन होते तर दुसऱ्यात ३.५ लिटरचे व्ही ८ इंजिन होते. माहीने यातील कोणते मॉडेल खरेदी केले हे अद्यापी कळलेले नाही. कंपनीला त्यांचा व्हिंटेज व क्लासिक कार विभाग अधिक मजबूत करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काही काळात १०० कोटी व्हेन्चर वर काम केले जात आहे. त्याअंतर्गत दर दोन महिन्यांनी लिलाव करण्याची योजना आखली गेली असून पुढचा लिलाव फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे.