जगभरातील खगोलतज्ञ आज सतर्क- पृथ्वीजवळून जाणार प्रचंड मोठी उल्का

आजची रात्र जगातील खगोलशास्त्रज्ञांसाठी विशेष महत्वाची आहे. याचे कारण म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री ३.२१ मिनिटांनी एक प्रचंड आकाराची उल्का पृथ्वीच्या जवळून प्रचंड वेगाने जाणार आहे. ही दुर्लभ घटना पाहण्यासाठी खगोलतज्ञ सतर्क आहेत. कुतुबमिनारपेक्षा ११ पट मोठ्या आकाराची ही उल्का सुमारे १ किमी लांबीची (३२८० फुट) असून प्रतीसेकंद २० किमीच्या वेगाने जाणार आहे. पृथ्वीपासून ही उल्का १९ लाख किमी अंतरावरून जाणार असली तरी अंतरीक्ष हिशोबाने हे अंतर खूपच कमी आहे असे सांगितले जात आहे.

या उल्केचे नामकरण (७४८३)१९९४ पीसी-१ असे आहे. पृथ्वीजवळून जाणाऱ्या बहुतेक उल्का या पेक्षा खूप दूरवरून जातात. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने या उल्केला तिचा विशाल आकार, वेग यामुळे संभावित धोकादायक उल्का श्रेणी मध्ये सामील केले आहे. ऑस्ट्रेलिया वेधशाळेतील खगोलशास्त्रज्ञ रोबर्ट मॅकनॉट यांनी १९९४ मध्ये या उल्केचा शोध लावला होता.

नैनितालच्या आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक शशीभूषण पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार ही उल्का आकाराने फारच मोठी आहे. बाकी उल्का काही फुट आकाराच्या असतात पण ही १ किमी लांबीची आहे. पुढच्या वेळी ३० वर्षानंतर ही उल्का पुन्हा पृथ्वीजवळ येणार आहे.