गिनीज बुक मध्ये नोंदलेला दुर्मिळ ब्लॅक डायमंड लिलावात

जगातील सर्वात मोठा पैलू पाडलेला ब्लॅक डायमंड अशी गिनीज बुक मध्ये नोंद झालेला दुर्मिळ हिरा सोथबे तर्फे पुढील महिन्यात लिलावात मांडला जात असून या हिऱ्याची खरेदी बीटकॉइन मध्ये सुद्धा ग्राहक करू शकणार आहेत. लिलावात या हिऱ्याला ४० ते ७० लाख डॉलर्स किंमत अपेक्षित आहे. म्हणजे २९ ते ५१ कोटी रुपये. ५१ कोटी किंमत मिळाली तर संबंधित खरेदीदार त्यासाठी १६० बीटकॉइन देऊ शकतो.

५५५.५५ कॅरटच्या या हिऱ्याला ‘एनिग्मा” असे नाव दिले गेले आहे. सोमवारी दुबई गॅलरी मध्ये तो प्रथम सार्वजनिक प्रदर्शनात ठेवला गेला. हिरा मालकाचे नाव जाहीर केले गेलेले नाही मात्र गेली २० वर्षे याच व्यक्तीकडे हा हिरा आहे. सोथबेच्या तज्ञ सोफी स्टीव्हन्स म्हणाल्या हा दुर्लभ काळा हिरा कार्बानाडो उल्कापिंड २.६ अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर आदळले तेव्हा तयार झाला असावा. कापायला हा हिरा अतिशय कठीण आहे. यापूर्वी तो कधीच सार्वजनिक प्रदर्शनात ठेवला गेलेला नाही. लिलावात ठेवण्यापूर्वी तो लॉस एंजेलिस आणि लंडन येथे प्रदर्शनात ठेवला जाणार आहे.

३ फेब्रुवारी पासून सात दिवस ऑनलाईन लिलाव केला जाणार असून हा हिरा म्हणजे ब्रह्मांडातील आश्चर्य मानले जात आहे. गेल्या वर्षी हॉंगकॉंग येथे १०१३८ डायमंड १२.३ दशलक्ष डॉलर्सला विकला गेला होता आणि विकत घेणाऱ्याने क्रीप्टोकरन्सी मध्ये त्याचे पैसे दिले होते तसेच हा ब्लॅक डायमंड सुद्धा क्रीप्टोकरन्सी देऊन विकत घेता येणार आहे. एनिग्मा २००६ मध्ये गिनीज बुक मध्ये सर्वात मोठा पैलू पडलेला हिरा म्हणून प्रमाणित केला गेला आहे.