हार्दिक पांड्याला मिळणार १५ कोटी पगार
आयपीएल २०२२ साठी खेळाडू लिलाव फेब्रुवारी मध्ये होणार आहेत मात्र त्यापूर्वीच नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रेंचांईजी ने तीन खेळाडू संघासोबत जोडले आहेत. हार्दिक पांड्याची कामगिरी सध्या फार चांगली होत नसतानाही त्याला अहमदाबाद फ्रेंचाईजीने १५ कोटी पगारावर संघात समाविष्ट केले असून गेल्या आयपीएलच्या तुलनेत हार्दिकला ४ कोटी रूपये अधिक मिळणार आहेत. मुंबई इंडियनने हार्दिकला रीटेन केले नव्हते. यावेळी आयपीएल मध्ये नव्याने सामील झालेल्या अहमदाबाद आणि लखनौ टीमने प्रत्येकी ३-३ खेळाडू मेगा ऑक्शन पूर्वीच आपल्यासोबत घेतले आहेत.
आयपीएल २०२२ मध्ये आता दहा संघ सामील आहेत. क्रीकइन्फोच्या माहितीनुसार अहमदाबाद फ्रेंचाईजीने हार्दिक बरोबर अफगाणिस्थानच्या लेग स्पिनर रशीद खान यालाही १५ कोटी पगार देऊ केला आहे. रशीद खान सनरायझर्स हैद्राबाद बरोबर दीर्घ काळ खेळला आहे पण या वर्षी त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. अहमदाबादचा तिसरा खेळाडू आहे शुभमन गिल. गिल गेल्यावेळी केकेआर कडून खेळत होता पण त्यावेळी त्याला रिटेन केले गेले नव्हते. रशीद खान याला गेल्यावेळेपेक्षा ६ कोटी पगार अधिक मिळणार असून त्याला प्रथम ९ कोटी मिळाले होते. शुभमन गिल याला प्रथम १.८ कोटी मिळाले होते त्याला आता ७ कोटी पगार दिला जाणार आहे. हार्दिकने पगारात धोनीला मागे टाकून विराटची बरोबरी केली आहे.