रणवीरसिंगला हवाय कामातून ब्रेक

बॉलीवूड अभिनेता रणवीरसिंग याचा ८३ हा वर्ल्ड कप आणि कपिल देव यांच्यावरचा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. यानंतर लगेचच रणवीरसिंग याने त्याचा विचार सोमवारी व्यक्त केला आहे. रणवीर म्हणतो,’ मला आता विश्रांती हवी आहे. त्यामुळे दीर्घ सुट्टी हवी आहे. आयुष्याशी संबंधित आणखी काही अनुभव मला घ्यायला हवेत. आपल्या झोळीत आयुष्यातील अन्य भूमिका जमा करेन आणि परत कामावर येईन.’ रणवीरने अशी इच्छा का व्यक्त केली यामागचे कारण कळलेले नाही. मात्र ८३ बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही आणि पत्नी दीपिकाचा ‘गहराइया’, सिनेमा हॉल ऐवजी ओटीटीवर रिलीज होणार हे कारण असू शकेल असे म्हटले जात आहे.

१० वर्षाहून अधिक काळ रणवीर बॉलीवूड मध्ये आहे आणि त्याच्या पिढीतील लोकप्रिय कलाकार आहे. भूमिकेच्या हिशोबाने स्वतःमध्ये बदल करण्यात तो माहीर मानला जातो. बाजीराव पासून पद्मावत मधील अल्लाउद्दिन खिलजी, सिम्बा, गलीबॉय अशी कुठलीही भूमिका त्याने सहज साकारली आहे. भूमिकांबाबत नवे नवे प्रयोग करण्यास तो प्राधान्य देतो कारण एकाच इमेज मध्ये अडकून पडलो तर आपण संपू अशी त्याला काळजी वाटते. रणवीरचे या वर्षी जयेशभाई जोरदार, सर्कस, रॉकी और रानीकी प्रेमकहानी हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.