फ्लाईंग हायपर कार, दुबईत चाचण्या यशस्वी
युएईमध्ये रस्ते वाहतूक लवकरच कमी होईल अशी लक्षणे दिसत आहेत. दुबईत नुकतीच हवेत उडणाऱ्या फ्युच्युरीस्टीक फ्लाईंग हायपर कारची परीक्षणे यशस्वी ठरल्याचे जाहीर केले गेले आहे. जमिनीपासून ३ हजार फुट उंचीवरून आणि ताशी २१७ किमी वेगाने ही कार उडू शकते. लवकरच दुबईच्या आकाशात मोठ्या संखेने अश्या कार दिसतील असे म्हटले जात आहे. वास्तविक या कारच्या चाचण्या नोव्हेंबर मध्येच झाल्या होत्या पण त्याचे फुटेज आज सार्वजनिक केले गेले आहे.
हवेत उडणारी वॉलर ईव्हीटीओएल प्रोटोटाईप कार लंडन मधील स्टार्टअप बेलवेदर इंडस्ट्रीजने बनविली आहे. पूर्ण इलेक्ट्रिक वॉलर ईव्हीटीओएल प्रोटोटाईपचे पहिले परीक्षण नोव्हेंबर २०२१ मध्ये झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हाफ स्केल व्हर्जनने ४० किमी ताशी वेगाने १३ फुट उंचीवरून उड्डाण केले. ही कार खासगी मालकांना त्यांच्या नेहमीच्या कार ऐवजी वापरता यावी असे त्याचे डिझाईन आहे. उबर प्रमाणे ऑनडिमांड ट्रान्सपोर्ट सुविधाही मिळू शकणार आहे. फुल स्केल मॉडेल २०२३ मध्ये तयार होत असून टेस्ट झाल्यावर फायनल मॉडेल २०२८ ला बाजारात येईल. प्रथम ही कार ऑनडिमांड ट्रान्सपोर्ट साठी प्राधान्याने विकली जाईल आणि खासगी ग्राहकांना २०३० पर्यंत मिळू शकेल.
ही अशी पहिलीच उडती कार आहे ज्याला मोठे पंख किंवा ब्लेडवाले इंजिन नाही. त्यामुळे शहरी वापरासाठी ती उपयुक्त आहे. या कारच्या आत्तापर्यंत आठ टेस्ट झाल्या आहेत असे समजते.