ओमिक्रोन विरोधात पुण्यात बनतेय पहिली स्वदेशी लस

भारताकडे कोविड १९ प्रतिबंधक पहिली मेसेंजर किंवा एम आरएएन (m RAN) लस लवकरच असेल असे खात्रीलायक वृत्त आहे. जीनोवा बायोफार्मास्यूटीकल या पुण्यातील प्रयोगशाळेने तिसर्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या असून ही कंपनी खास करून ओमिक्रोन साठी लस तयार करते आहे. त्यासाठी सुद्धा मेसेंजर प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जात आहे.

पुण्यातील जीनोवाने दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा डेटा रेग्युलेटरी अप्रुव्हल साठी दिला आहे. सार्स कोव २ व्हायरस डेल्टा व्हेरीयंट साठीच्या या दोन डोस लसीच्या एम आरएएन फेज दोनच्या चाचण्या ३००० लोकांवर घेतल्या गेल्या असून आता चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण होत आहे. रेग्युलेटरी अप्रुव्हल येईपर्यंत रिस्क मॅन्यूफॅक्चरिंग सुरु केले गेले आहे. रेग्युलेटरी बोर्ड कडून परवानगी मिळण्यापूर्वी ही प्रक्रिया केली जाते. परवानगी मिळाली कि पुरेश्या प्रमाणात उत्पादन सुरु केले जाते. काही वेळा अशी परवानगी मिळाली नाही तर उत्पादित लस वाया जाते म्हणून त्याला रिस्क मॅन्यूफॅक्चरिंग असे म्हटले जाते.

ओमिक्रोन विरोधातील पहिली स्वदेशी लस कंपनीने तयार केली आहे मात्र त्याच्या मानवी चाचण्या व्हायच्या आहेत. या चाचण्या झाल्यावर प्रतिबंध क्षमता किती वाढते आणि लसीचा परिणाम समजू शकणार आहे. विशेष म्हणजे मेसेंजर प्लॅटफॉर्मचा वापर करून लस बनविली तर आगामी व्हेरीयंट नुसार लसीमध्ये बदल करणे शक्य असते. सेन्ट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या डेटाचे अध्ययन करणार आहे आणि मग त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

राष्ट्रीय कोविड १९ कार्यप्रमुख डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार m RAN प्लॅटफॉर्मवर करोना लस बनविणे ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे देशात उपलब्ध असलेली कोल्ड चेन सुविधा पुरेशी ठरणार असून अन्य लसी याच प्लॅटफॉर्मवर तयार होऊ शकतील. त्या साठविण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार नाही. ओमिक्रोनवर जगातील अनेक फार्मा कंपन्या लस बनवीत आहेत त्यात भारत बायोटेक बरोबरच मॉडर्ना, जेनसेन, सायनोफार्म, गामलिया, नोवावॅक्स, एस्ट्राजेनेका यांचाही समावेश आहे.