मस्क यांच्या टेस्लाला या राज्यांचे आमंत्रण

एलोन मस्क यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीट मध्ये ‘मस्क यांना भारतात टेस्ला इलेक्ट्रिक कार आणायची आहे आणि केंद्र सरकारकडून त्यासाठी पुरेसे सहकार्य मिळत नाही’ असे लिहील्यावर त्याला उत्तर म्हणून मस्क यांना देशातील तीन राज्यांनी टेस्लासाठी सहकार्य देण्याचे आणि आमच्याच राज्यात यावे असे आमंत्रण दिले आहे. यापूर्वी तेलंगाना सरकारने टेस्लासाठी एलोन मस्क यांना आमंत्रण दिले होतेच पण आता महाराष्ट्र, प.बंगाल आणि पंजाब राज्यांनी एलोन यांना आमंत्रण दिले आहे.

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी ट्वीट करून महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतशील राज्य असून एलोन यांनी टेस्लाच्या उत्पादन प्लांटची स्थापना महाराष्ट्रात करावी असे म्हटले आहे. महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे प.बंगालचे मंत्री मोहम्मद गुलाम रब्बानी यांनी शनिवारी मस्क यांच्या ट्वीटला उत्तर देताना बंगाल मध्ये यावे असे आमंत्रण दिले आहे. तर पंजाब मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी मस्क यांनी लुधियाना मध्ये कारखाना सुरु करावा असे म्हटले आहे.

मस्क यांच्या म्हणण्यानुसार भारतात व्यवसाय सुरु करण्यास कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बरेच दिवस एलोन मस्क भारतात व्यवसाय सुरु करण्यास उत्सुक आहेत पण त्यांनी केंद्र सरकारवर टेस्लाच्या आयात कारवर कर सवलत दिली जावी असा दबाव आणला आहे आणि केंद्राने त्याला स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या वर्षी मस्क यांनी भारतात आयात कार वरील कर सर्व जगात जास्त असल्याचे सांगून कर सवलत मागितली होती. आयात कार कर सवलत दिली तर आपण भारतात कारखाना सुरु करू असे मस्क यांचे म्हणणे आहे.

मात्र केंद्र सरकारने मस्क यांनी अगोदर उत्पादन कारखाना भारतात सुरु करावा आणि मग कर सवलतीचा लाभ त्यांना मिळू शकेल असे सुनावले आहे. मस्क यांना सुरवातीला कर सवलत दिली तर अन्य परदेशी कंपन्यांना सुद्धा अशीच सवलत द्यावी लागेल असे केंद्राचे म्हणणे आहे. भारतात आयात इलेक्ट्रिक कारवर आयात कर ६० ते १०० टक्के आकारला जातो. ४० हजार डॉलर्सपेक्षा अधिक किमतीच्या कार्स साठी १०० टक्के आयात कर आहे. मस्क यांना भारतात महिंद्रा, टाटा, मारुती अश्या अनेक कार उत्पादकांचे आव्हान पेलावे लागणार आहे.