चीनी लोकांमध्ये चीनी नव्हे तर या स्मार्टफोनची  क्रेझ

चीन मधील स्मार्टफोन ग्राहक चीनी कंपन्यांच्या स्मार्टफोन खरेदी पेक्षा अमेरिकन कंपनी अॅपलच्या आयफोनची दणकून खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अॅपल चीन मध्ये नंबर वन ब्रांड बनला आहेच पण गेल्या सलग आठ आठवडयात कमाई मध्ये सुद्धा टॉप ब्रांड बनला आहे.

जगभरात आज चीनी स्मार्टफोनची लोकप्रियता मोठी आहे. भारतात शाओमी ही चीनी कंपनी स्मार्टफोन बाजारात आपले वर्चस्व राखून आहे. इतकेच नव्हे तर वेळोवेळी केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणात भारतात दर १० पैकी ८ चीनी स्मार्टफोन खरेदी होतात असेही दिसून आले आहे. पहिल्या पाच टॉप स्मार्टफोन कंपन्यात एक सॅमसंग सोडली तर बाकी चार चीनी स्मार्टफोन कंपन्या आहेत. या पार्श्वभूमीवर चीन मध्ये मात्र तेथील नागरिक स्वदेशी पेक्षा अमेरिकन स्मार्टफोन कंपनीला अधिक पसंती देत आहेत.

आयफोन १३ सिरीज आल्यापासून चीन मध्ये हा ट्रेंड दिसून येत आहे. सध्या चीन मार्केट मध्ये अॅपल लीड करत आहे. अर्थात अॅपलला चीनी विवोकडून टक्कर देण्याचा प्रयत्न होत आहे. हुआई वर अमेरिकेने बंदी घातल्याचा फायदा अॅपलला मिळत असल्याचे जाणकार सांगत आहेत. अमेरिकन बंदी मुळे हुवाई समोर उत्पादनाची मोठी आव्हाने आहेत. कौंटर पॉइंट रिसर्चचे संचालक टॉम कांग यांच्या म्हणण्यानुसार आयफोन १३ ची कमी किंमत, चांगली क्वालिटी, नवीन कॅमेरा आणि फाईव्ह जी सपोर्ट यामुळे चीनी नागरिक आयफोनला पसंती देत आहेत. चीन मध्ये आयफोन १३, १३ प्रो आणि १३ प्रो मॅक्स बरोबर आयफोन १२ला सुद्धा युजर्सकडून वाढती मागणी आहे.