१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण देशात लवकरच सुरु

देशात सध्या ६० वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस दिला जात आहे आणि १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाले आहे. एनटीएजीआय ग्रुपचे प्रमुख डॉ.एन के. अरोरा यांनी यापुढच्या टप्प्यात १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले जात असल्याचे संकेत दिले असून हे लसीकरण फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरवातीपासून सुरु होईल असे म्हटले आहे.

डॉ. अरोरा म्हणाले १५ ते १८ वयोगटासाठी ३ जानेवारी पासून लसीकरण सुरु झाले आहे आणि आत्तापर्यंत ३ कोटी हून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. १३ दिवसात ४५ टक्के मुलांना पहिला डोस मिळाला आहे. जानेवारीच्या अखेरीपर्यंत ७.४ कोटी मुलांना पहिला डोस दिला जाईल असा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीपासून या मुलांना लसीचा दुसरा डोस देण्याची सुरवात केली जाणार आहे.

१२ ते १५ वयोगटासाठी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरवातीपासून लसीकरण सुरु होईल असे सध्याच्या वेगावरून दिसत असल्याचे सांगून डॉ. अरोरा म्हणाले १२ ते १८ हा गट मोठ्या माणसांप्रमाणे मानला जातो आणि त्यामुळे त्यांचे लसीकरण प्रथम करण्यास प्राधान्य दिले गेले आहे. या गटाचे लसीकरण पूर्ण झाल्यावर त्या खालचा वयोगट विचारात घेतला जाणार आहे.