सलमान खानचा शेजाऱ्याविरोधात मानहानीचा दावा


बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. आपल्या पनवेल येथील फार्महाऊसमधील फोटो, व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमान लॉकडाउनमध्येही त्याच्या या पनवेल येथील घरामध्ये राहत होता. तेथील एका शेजाऱ्याविरोधात सलमानने तक्रार दाखल केली आहे.

याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कर विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्याने असे म्हटले आहे की, सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे.

केतन कक्कर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. आता २१ जानेवारीला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.