ब्रिटनचे पंतप्रधान होणार भारतीय वंशाचे ऋषी सुनक ?


ब्रिटन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पाय आणखी खोलात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जॉन्सन यांच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला पार्टी केली होती. लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या डाउनिंग हाऊस निवासस्थानाच्या गार्डनमध्ये पार्टी केल्याच्या वृत्तावरून वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ब्रिटनची संसद हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉन्सनने माफीही मागितली आहे. पण, आता हे प्रकरण एवढे गंभीर झाले आहे की आता त्यांच्या पक्षाच्या खासदारांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे. कारण, हे प्रकरण असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना महामारीच्या काळात 2020 मध्ये लादलेल्या लॉकडाऊनदरम्यान गार्डन ऑफ डाऊनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी करण्यासाठी त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होत आहे. जॉन्सन यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमधील आघाडीची सट्टा कंपनी ‘बेटफेअर’ने दावा केला आहे की, अडचणीत आलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांची त्यांची जागी पंतप्रधान म्हणून वर्णी लागू शकते.

बेटफेअरने म्हटले आहे की, कोरोनाकाळात 57 वर्षीय जॉन्सन यांनी पंतप्रधान कार्यालय डाउनिंग स्ट्रीट येथे आयोजित केलेल्या ड्रिंक पार्टीच्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर केवळ विरोधी पक्षांच्या वतीनेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या वतीनेही राजीनामा देण्याची मागणी होत आहे. ‘बेटफेअर’चे सॅम रॉसबॉटम यांनी ‘वेल्स ऑनलाईन’ला सांगितले की, जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यास ऋषी सुनक हे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लिझ ट्रस (परराष्ट्र मंत्री) आणि त्यानंतर मायकेल गोव्ह (कॅबिनेट मंत्री) यांचा क्रमांक आहे. दरम्यान, या शर्यतीत माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांचाही समावेश आहे.