मुंबईकरांना आधार कार्डशिवाय मिळणार नाही होम टेस्टिंग किट – महापौर किशोरी पेडणेकर


मुंबई – आता मुंबईकर कोरोनाची सेल्फ टेस्ट किट खरेदी करण्यासाठी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज अशी घोषणा केली की, तुम्ही आधार कार्डशिवाय आता कोरोनाची होम टेस्टिंग किट खरेदी करू शकणार नाही. त्याची नोंद सर्व केमिस्ट मालकांना ठेवावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. कारण जो व्यक्ती होम टेस्टिंग किट विकत घेत होता, तो व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर माहिती देत नव्हता. त्यामुळे आता होम टेस्ट किट घेताना आधार कार्ड आवश्यक असणार आहे. पत्रकार परिषदेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, आधार कार्डशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ अजूनही कायम आहे. यादरम्यान घरच्या घरी होम टेस्टिंग किट घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 1 लाख 6 हजार 987 जणांनी 13 जानेवारी 2022 पर्यंत स्वतःची कोरोना चाचणी होम टेस्टिंग किटद्वारे केली. यामध्ये 3 हजार 549 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. आता आधार कार्डनंबर दिल्याशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही. तुमची चाचणी जर पॉझिटिव्ह आली असेल, तर सांगा. लोकांनी घाबरू नये, तुमची तब्येत बिघडली तर आमची यंत्रणा सज्ज आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर हे होम टेस्टिंग किट महानगरपालिकेसाठी डोकेदुखी बनल्याचे पाहायला मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक त्यांचा अहवाल आयसीएमआरसोबत शेअर करत नाहीत. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांच्या संख्येत होम टेस्टिंग किटची आकडेवारी समाविष्ट नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. लोक स्वतः घरी चाचणी करतात आणि जेव्हा त्या सकारात्मक येतात, तेव्हा माहिती लपवतात. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत होम टेस्टिंग किटद्वारे सुमारे 96 हजार लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचवेळी, तिसऱ्या लाटेपासून लाखो लोकांनी या किट्सची खरेदी केली आहे.