कुणी सोबत आले नाही, तर शिवसेना स्वबळावर लढणार गोवा निवडणूक – संजय राऊत


मुंबई – गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोवा काँग्रेसला एक सूचक इशारा दिल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेकडून या निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्याचा कसोशीने प्रयत्न केला गेला पण यात शिवसेनेला यश आले नसल्याचे दिसत असल्यामुळे आता गोव्यातील सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने कोणीच सोबत जर आले नाही, तर स्वबळाची देखील तयारी दर्शवली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वरील वक्तव्य केले आहे. शिवाय, भाजपची गोव्यातील फोडा-झोडा व राज्य करा ही नीती असल्याचा आरोप करत, भाजपला बहुमत मिळणार नसल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत.

आमची काँग्रेसबरोबर काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगत आहे. पण ठीक आहे, त्यांना तरंगू द्या, तडाखे बसतात मग. शिवसेना स्वतंत्रपणे लढेल आणि शिवसेना येथे पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. प्रत्येक निवडणुकीतून शिवसेना येथे वाढतच गेली आहे. भाजपदेखील कधीकाळी सुरूवातीला येथे जेव्हा लढला होता, तेव्हा १२-१३ जागांवर लढला होता. तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. हे राजकारणात निवडणुकांमध्ये हे असे सुरूवातीच्या काळात होत असते.

भाजपचे एकदा लोकसभेत ३६० उमेदवारांचे डिपॉझिट गेले होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुसंख्य लोकाचे डिपॉझिट गेले आहे, म्हणून लढायचे नाही का? पण आता शिवसेना गोव्यात रूजते आणि रूजली आहे. एकतर महाराष्ट्र सरकारचा प्रभाव आहे, ठाकरे सरकारचा प्रभाव आहे, शिवसेना काम करत आहेत, आमचे लोक आणि भाजपविषयी त्यांच्या सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे. येथे गोव्यात जो भाजप दिसत आहे, कुठे आहे पक्ष त्यांचा? कधीही स्वबळावर त्यांचे येथे सरकार आले नाही. जेव्हा मनोहर पर्रिकर होते, तेव्हा देखील. बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे त्याचे आमदार फोड, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपची गोव्यातील नीती असल्यामुळे आम्हाला काही चिंता नसल्याचे संजय राऊत एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले आहेत.

तसेच, भाजपला यावेळी देखील बहुमत मिळणार नाही. लोक निवडून देणार नाहीत, हे तुम्ही लिहून ठेवा. शिवसेना साधारण १४-१५ जागा लढेल, अशी आमची एक भूमिका आहे. कोणाबरोबरही युती होत नाही, होण्याची शक्यता नाही. कारण, काँग्रेस आणि भाजपने आपआपले उमेदवार दिलेले आहेत. नक्कीच काँग्रेसने आम्हाला काही जागा देण्याचा प्रयत्न केला. दोन किंवा तीन जागा ते आम्हाला देत होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत आहे. त्याच्या विषयी काही निर्णय होत नव्हता, त्यामुळे आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्र येऊन गोव्यात निवडणूक लढवू. साधारण दोन ते तीन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल पटेल हे गोव्यात येतील, मी देखील असेल आणि आम्ही आमच्या जागा जाहीर करू, अशी माहिती देखील संजय राऊत यांनी यावेळी दिली.

याचबरोबर, भाजपचे आव्हान तुम्ही मानत नाही आहात का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे पाहा कोणालाच कोणचे गोव्यात आव्हान नाही. गोव्यात दहा-बारा लोक आहे, ते कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात, कधी इकडे तर कधी तिकडे, हे जे प्रस्थापित लोक आहेत. गोव्याचे तेच राजकारण करतात. सामान्य माणसाला येथे संधीच नाही. शिवसेना सामान्यातील सामान्य माणसाला उमेदवारी देऊन निवडणुका लढणार, असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

तर, गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयत्न आणि सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले होते. तसेच काही गोष्टी अ‍ॅडजस्ट करायला लागतात, असे सूचक वक्तव्यही केले होते. संपर्क करायला उशीर झाला, हे काँग्रेस नेते दिगंबर कामत यांचे बरोबर असल्याचे मान्य करत, त्यांनी आघाडीत काही गोष्टी अ‍ॅडजस्ट कराव्या लागतात, असे म्हटले होते. तसेच गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याचेही स्पष्ट करत टीएमसीचेही नेते भेटणार असल्याचेही सांगितले होते.