देवेंद्र फडणवीसांनी साधला शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा


मुंबई – सध्या देशपातळीवरील राजकारण पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापलेले दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकारण विशेष करून उत्तर प्रदेश व गोवा येथील निवडणुकांवरून गरम झाले आहे. कारण, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी यांनी देखील या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे या दोन्ही ठिकाणी सत्तेत असलेल्या भाजपनेही कंबर कसलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष गोव्यात टीएमसी, काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. तर, गोव्याचे भाजप प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष आहे. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावे लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचे! असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

तसेच, निश्चितच, गोव्यात पुन्हा भाजप सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा, तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. पण गोव्यात आता सगळ्या मोठी अडचण अशी आहे की, हे निश्चित होणे बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे, हे जर निश्चित झाले, तर त्यावर बोलता येईल, असे एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

याचबरोबर, शरद पवार गोव्यात भाजपला आव्हान देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, हे पाहा विरोधकांचे म्हटले तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उसके जैसा…, मग कधी ते समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी, तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचे काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल पण ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही.

काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची गोव्यात चर्चा सुरू आहे. गोव्यात आम्हाला काही ठिकाणी निवडणूक लढवायची होती, त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली आहे. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.