कंगना राणावतवर काँग्रेस आमदाराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता


रांची – गेल्या महिन्यात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चांगलेच चर्चेत राहिले होते. त्यांना त्यांच्या या वक्तव्यावरून टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. खुद्द अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी देखील या प्रकरणावरून एखाद्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीला अशी वक्तव्ये करणे शोभत नसल्याचे म्हणत सुनावले होते. दरम्यान, आता एका काँग्रेस आमदाराने आपल्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणावतच्या गालासारखे बनवणार असल्याचे वक्तव्य केले आहे.


आपल्या झारखंडमधील जामतारा या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणावतच्या गालापेक्षा अधिक चांगले होतील, असे वक्तव्य झारखंडचे काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी करून वादात सापडले आहेत. त्यांनी शुक्रवारी पोस्ट केलेल्या स्वत: तयार केलेल्या व्हिडीओमध्ये, डॉ इरफान अन्सारी म्हणतात की, लवकरच जामतारा येथे जागतिक दर्जाच्या १४ रस्त्यांचे बांधकाम सुरू होईल. हे रस्ते अभिनेत्री कंगना राणावतच्या गालापेक्षा जास्त चांगले असतील, याची मी खात्री देतो.

या आठवड्याच्या सुरुवातीला डॉ. इरफान अन्सारी त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत होते. तेव्हा त्यांनी लोकांनी कोरोनापासून बचावासाठी जास्त काळ फेस मास्क घालू नये, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे वक्तव्य केले होते. स्वतः डॉक्टर असल्याचे म्हणत मास्कचा जास्त आणि दीर्घकाळ वापर केल्याने कार्बन डायऑक्साइड इनहेलेशन होते, असे ते म्हणाले होते. दरम्यान, इरफान अन्सारी यांनी कंगना राणौतवर केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.