आता मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार बायोपिकमधून कॉमेडियन कपिल शर्माचे जीवन


देशातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडियनपैकी एक कपिल शर्मा मानला जातो. त्याने प्रचंड मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कपिलला आज त्याच्या कामामुळे ओळखले जाते. मनोरंजन क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना कपिलने बाजी मारली आहे. त्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आता यशाच्या शिखरावर असलेल्या कपिल शर्माने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांची ही स्ट्रगल स्टोरी आता मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला कपिल शर्माचा बायोपिक येणार आहे.


कपिल शर्माच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून निर्माता महावीर जैन यांनी नुकतीच याची घोषणा केली आहे. कपिल शर्माच्या चाहत्यासाठी त्याच्या बायोपिकची घोषणा ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. सोशल मीडियावर सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि कपिलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘फनकार’ असे कपिल शर्माच्या जीवनावर तयार होत असलेल्या या चित्रपटाचे नाव असणार आहे.


मृगदीप सिंह लांबा कपिल शर्माच्या जीवनावर आधारित ‘फनकार’ या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. याआधी त्यांनी ‘फुकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान चालला होता. याच चित्रपटातून मृगदीप सिंह लांबा यांना दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख मिळाली होती. दरम्यान या चित्रपटात कपिलची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही. कदाचित कपिल शर्मा स्वतःच त्याच्या बायोपिकमध्ये काम करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आपल्या आयुष्यात कपिल शर्माने बरेच चढ-उतार पाहिले आहेत. यशस्वी करिअरनंतर डिप्रेशन, सुनिल ग्रोव्हरशी भांडण, शो बंद होणे, अशा अनेक समस्यांचा सामना केल्यानंतर कपिलने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. अनेक वादग्रस्त कारणांमुळे तो चर्चेतही राहिला होता. कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर लवकरच त्याचा ‘कपिल शर्माः आय अॅम नॉट डन येट’ हा शो नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.