रेल्वेचे आधुनिकीकरण- गार्ड होणार ट्रेन मॅनेजर

रेल्वे बोर्डाने आधुनिकीकरण योजनेअंतर्गत एक मोठा निर्णय घेतला असून यापुढे रेल्वे गार्ड ट्रेन मॅनेजर या पदनामाने ओळखले जाणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे कर्मचारी दीर्घकाळ पदनाम बदलाची मागणी करत होते. त्यानुसार आता गार्डच्या कामात बदल होणार नाही मात्र त्यांचे पदनाम असिस्टंट गार्ड वरून असिस्टंट पॅसेंजर ट्रेन मॅनेजर व सिनिअर पॅसेंजर ट्रेन मॅनेजर असे झाले आहे. पदनाम बदलले तरी कामात बदल नसल्याचे पगार तेच राहणार आहेत असेही समजते.

रेल्वे गार्डचा सुरवातीचा पगार ३० हजार रुपये असून त्यांना अनेक प्रकारचे भत्ते मिळतात. मालगाडी गार्डना दर किलोमीटर हिशोबाने भत्ते दिले जातात. रेल्वेची इमेज कार्पोरेट धर्तीवर केली जात आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड अध्यक्ष आता सीईओ झाले आहेत. काही खास रेल्वे गाड्यांचे संचालन खासगी कंपन्यांना सोपविण्याची योजना तयार केली जात आहे त्यानुसार पदनामे बदलली जात असल्याचे समजते. रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा हा एक भाग आहे. रेल्वे गार्डचे पदनाम ट्रेन मॅनेजर झाल्याने त्यांना समाजात सन्मान्यजनक आयुष्य मिळू शकेल असेही म्हटले जात आहे.