कसोटी मालिका हरुनही टीम इंडियाने केले विचित्र रेकॉर्ड

भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्याची मालिका भारताने २-१ अशी गमावली आहे आणि तरीही एका विचित्र रेकॉर्डची नोंद केली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊन येथे झाला त्यात द.आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी पूर्ण वर्चस्व राखून भारताचा ७ विकेटने पराभव केला. फलंदाजांना वेगवान गोलंदाजीचा सामना करताना खूपच अडचणी आल्या. कसोटी इतिहासाच्या १४५ वर्षात टीम इंडियाने यावेळी विचित्र रेकॉर्ड नोंदविले.

या सामन्यात टीम इंडियाचे सर्व फलंदाज दोन्ही डावात कॅच आउट झाले. म्हणजे दोन्ही डावात टीम मधील कुणीही फलंदाज बोल्ड, एलबीडब्ल्यू, रनआउट झाला नाही तर सर्व २० फलंदाज कॅच देऊन तंबूत परतले. २०२२ च्या सुरवातीलाच टीम इंडियाने हे रेकॉर्ड नोंदविले. पूर्वी एका टीमचे १९ फलंदाज एकाच सामन्यात कॅच आउट होण्याचा प्रकार पाच वेळा घडला आहे. पण २० खेळाडू कॅच आउट होण्याचा प्रकार १४५ वर्षात प्रथमच घडला आहे.

यापूर्वी १९८२ व २०१३ मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेश कसोटी मालिका खेळताना इंग्लंडचे १९ फलंदाज  कॅच आउट झाले आहेत. पाकिस्तानने २००९-१० मध्ये सिडनी येथील टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ फलंदाज कॅच आउट होऊन गमावले आहेत. २०१९-२० मध्ये केपटाऊन येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना द.आफ्रिकेने असेच स्वतःचे नुकसान करून घेतले आहे तर २०१०-११ मध्ये द.आफ्रिका संघ भारतात आला असताना असेच १९ फलंदाज कॅच आउट झाले आहेत.